आमदार काळे रस्त्यांवर तळे म्हणत रस्ता समस्येकडे कोपरगावकरांचे वेधले लक्ष
तीन हजार कोटी प्रवासाला बोटी म्हणत आमदारांच्या कारभारावर युवकांचा अनोखा निषेध
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरातील व तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था दिवसेंदिवस नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू लागली आहे. तीन हजार चार हजार कोटी रुपये निधी खर्च झाल्याच्या दाव्यांनंतरही रस्त्यांवर खड्डेच खड्डे कायम आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांत तळ्यांसारखं पाणी साचून प्रवास नागरिकांसाठी रोजचं दु:स्वप्न बनलं आहे. या पार्श्वभूमीवर काही तरुणांनी अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करत संताप व्यक्त केला.
रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये त्यांनी कागदी होड्या सोडत तीन हजार कोटी प्रवासाला बोटी, आमदार काळे रस्त्यावर तळे अशा उपरोधिक घोषणा दिल्या. होड्यांबरोबरच रस्त्याच्या कडेला पडलेल्या खड्ड्यात बसून होड्या सोडत एका प्रतिकात्मक मोठ्या होडीवर उपरोधिक संदेश लिहीत जनजागृती करण्याचा प्रयत्न झाला आहे.
विकासाच्या गप्पा मोठ्या, पण नागरिकांना रस्त्यावर मात्र बोट चालवण्याची वेळ आली आहे असा थेट टोला तरुणांनी लगावला. मोठ्या पर्यटनस्थळी जाण्याची गरज आम्हाला राहिली नसून शहरातच चौका चौकात साचलेल्या तळ्यांमध्ये नौका विहाराचा आनंद आम्ही घेतो आहोत अशी प्रतिक्रिया या युवकांनी व्यक्त केली.
या निषेधामुळे आमदार आणि प्रशासनाची झोप उडणार का, की खड्ड्यांतच पुढील काळात आरसे दिसणार, हा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
सत्ताधाऱ्यांनी लाखो कोटींचा हवाला दिला असला तरी कोपरगावकर आजही रस्त्याच्या साचलेल्या तळ्यातून प्रवास करतात ही वस्तुस्थिती मांडली आहे.






