सोनेवाडी लोकवस्तीत बिबट्या कडून दोन शेळ्या फस्त
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
कोपरगाव (लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी मध्ये भर लोकवस्तीत शुक्रवारी रात्री तीस हजार रुपये किमतीच्या दोन गाभण शेळ्या ठार करत त्यांना फस्त केले. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वन विभागाने तात्काळ या परिसरात पिंजरा लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
शुभम रावसाहेब वायसे हे बिरोबा मंदिर परिसरात राहतात. त्यांनी रात्री आठ वाजता जनावरांची चारा वैरण केली व शेळ्या शेडमध्ये बांधल्या. बिबट्याने रात्री शेडमध्ये बांधलेले शेळ्यांवर हल्ला केला व त्यांना ठार केले. पहाटे पाच वाजता शुभम वायसे यांच्या घडलेला प्रकार लक्षात आला त्यांनी तात्काळ मित्रांना फोन करून बोलून घेतले. तुषार जावळे यांनी पोलीस पाटील दगू गुडघे यांना या संदर्भात माहिती दिली. त्यांनीही वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. वन विभागाचे अधिकारी संतोष सुरासे घटनास्थळी दाखल झाले. मृत झालेल्या शेळ्यांचा त्यांनी पंचांसमोर पंचनामा केला.यावेळी साहेबराव पोतकुले, दिनेश गुडघे, निलेश वायसे, पृथ्वीराज वायसे,शुभम वायसे अदी उपस्थित होते.
सोनेवाडी परिसरात अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे अनेक वेळा वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातूनही पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे मात्र या सदर्भात वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीच कारवाई झालेली नाही. आता तर बिबट्या भरलोक वस्तीत येत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण झाले आहे. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावा अशी मागणी होत आहे..






