banner ads

कोपरगावात राष्ट्रवादीच्या अविरत जनसेवेच्या दहीहंडीला राज्यभरातील गोविंदा पथकांची उपस्थिती

kopargaonsamachar
0

 कोपरगावात राष्ट्रवादीच्या अविरत जनसेवेच्या दहीहंडीला राज्यभरातील गोविंदा पथकांची उपस्थिती


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे  )
दहीहंडीचा हा उत्सव म्हणजे फक्त गोविंदांचा खेळ नाही, तर हा खेळ एकता, धैर्य आणि मेहनतीचा संदेश देणारा उत्सव आहे.भगवान श्रीकृष्ण हे केवळ धर्माचे नव्हे, तर कुशल नेतृत्वाचे व धोरणशास्त्राचे प्रतीक आहेत. त्यांनी प्रत्येक संकटात मार्ग शोधला, संकटावर मात केली आणि समाजाला एक नवी दिशा दिली. या दहीहंडी उत्सवात ज्याप्रमाणे गोविंदा पथक एकत्र येवून मानवी मनोरे उभे करतात हीच प्रेरणा घेवून तुम्ही असेच नेहमी सोबत राहा. आपण सर्वजण मिळून कोपरगावच्या विकासाचा भव्य मनोरा उभा करू असा निर्धार आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सव प्रसंगी उपस्थित जन समुदायाशी संवाद साधतांना केला.

कोपरगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सवाचे भव्य दिव्य स्वरुपात आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी सोहळ्यासाठी राज्यभरातील नामवंत गोविंदा पथकांनी हजेरी लावली होती. यामध्ये कल्याण येथील श्री साईलीला महिला गोविंदा पथकाने दहीहंडी उत्सवात सहभागी होत महिलाही कुठे कमी नाहीत हे दाखवून देत यशस्वी सहा थर रचले. यावेळी पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की,मागील पाच वर्षात कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली आहेत.यामध्ये सर्व समाजांसाठी सभागृह,व्यापारी संकुलांची उभारणी,महापुरुषांचे पुतळे व सुशोभिकरण,पोलिस वसाहत व प्रशासकीय इमारतींची उभारणी ही काही कामे पूर्ण झाली आहेत, तर काही कामे प्रगतीपथावर असून सर्वात महत्वाचा आणि महिला भगिनींच्या अतिशय जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. आजची आपली दहीहंडी हि अविरत जनसेवेची आहे त्यामुळे यापुढील काळातही विकास कामे अविरतपणे सुरूच राहणार असून लवकरच २३२ कोटीच्या भूमिगत गटारीच्या कामास शुभारंभ होईल. मिमिक्री आणि टिंगलटवाळी करून कधीही विकास होत नसतो त्यासाठी ठोस निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेतांना अडथळे देखील येतात, पण मी कधीच मागे हटलो नाही आणि हटणार पण नाही कारण माझ्या पाठीशी कोपरगावकर आहेत आणि त्यांचा विश्वास आहे.ज्याप्रमाणे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी निवडून देतांना मला राज्यात क्रमांक पाचचे मताधिक्य दिले ते ऋण मी कधीही विसरणार नाही.येणाऱ्या कोपरगाव नगरपरिषदेच्या निवडणुकीत देखील आपली साथ आणि आपला विश्वास असाच माझ्या पाठीशी ठेवा आपण सर्वजण मिळून भगवान श्रीकृष्णाच्या प्रेरणेने कोपरगावचं समृद्ध भविष्य घडवून विकासाचा भव्य मनोरा उभारू असे उपस्थित जनसमुदायाला त्यांनी विश्वास दिला.
या अविरत जनसेवेच्या दहीहंडी उत्सव सोहळ्यात राज्यातील अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता यामध्ये कल्याण इगतपुरी येथील गोविंदा पथकांचा समावेश होता.या गोविंदा पथकांचा उत्साह वाढविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावर हजारोंच्या संख्येने कोपरगावकर उपस्थित होते यामध्ये महिलांची संख्या देखील लक्षणीय होती.अभिनेत्री ज्योत्सना सपकाळ व त्यांच्या सहकारी कलाकारांनी केलेले नृत्याविष्कार, डी.जे.आशु आणि डी.जे मॅडी यांच्या धमाकेदार बीट्सने गोविंदा पथकांच्या व नागरिकांचा उत्साह द्विगुणीत केला.याप्रसंगी युवा कार्यकर्त्यांच्या हातातील आ.आशुतोष काळे यांचे ‘जलनायक’ चे होर्डीग्ज कोपरगावकरांचे लक्ष वेधून घेत होते.आ.आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार गोविंदा पथकांच्या सुरक्षेची योग्य प्रकारे काळजी घेवून दहीहंडीच्या खाली वाळूचा टाकून व त्यावर गाद्या टाकण्यात आल्या होत्या त्यामुळे एकही गोविंदाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही त्याबद्दल सर्व गोविंदा पथकांनी समाधान व्यक्त करून पुढच्या वर्षी नव्या जोमाने,नव्या उत्साहात येणार असल्याचे सांगितले.कल्याण येथील श्री साई लीला महिला गोविंदा पथकाने यशस्वी सहा थर रचले तर इगतपुरीच्या जय हनुमान गोविंदा पथक व शिर्डीच्या शंभू राजे प्रतिष्ठान या गोविंदा पथकांनी यशस्वीपणे सात थर रचले परंतु एकाही गोविंदा पथकाला आठवा थर रचता न आल्यामुळे एकही गोविंदा पथक दहीहंडी पर्यंत पोहोचू शकले नाही. सात थर रचणाऱ्या दोन्ही पथकांना पहिले बक्षीस विभागून तर श्री साई लीला महिला गोविंदा पथकास दुसरे बक्षीस आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आले.  


यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

                           

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!