banner ads

आयुर्वेदाचा दृष्टिकोन निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचा – योगगुरू अभिजीत शहा

kopargaonsamachar
0

 आयुर्वेदाचा दृष्टिकोन निरोगी आयुष्यासाठी महत्त्वाचा – योगगुरू अभिजीत शहा


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे ): 
कोपरगाव शहरातील साई सिटी येथील समता आरोग्य मंदिर येथे दैनंदिन जीवनशैली, आहार-विहार आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदाचा दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम १ ऑगस्टपासून सुरू असलेल्या शास्त्रोक्त योगवर्गाच्या वतीने १६ ऑगस्ट २०२५ रोजी घेण्यात आला होता. या प्रसंगी प्रख्यात योगगुरू अभिजीत शहा यांनी उपस्थितांना वस्तुनिष्ठ मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात बोलताना योगगुरू अभिजीत शहा म्हणाले, “नुसते हालचाली करणे म्हणजे योग नाही. योग्य आहार-विहार, सात्त्विक जीवनशैली, प्राणायाम आणि नियमित साधनेच्या साहाय्यानेच शरीर सक्षम होते व रोगप्रतिकारशक्ती वृद्धिंगत होते.”
ते पुढे म्हणाले की, आहार हा केवळ पोट भरण्यासाठी नसून तो प्रकृती, वेळ आणि प्रमाणानुसार घेतला गेला तरच हितकारी ठरतो. “कसा, कधी, कुठे, कोणता, केव्हा आणि का?” या तत्वांनुसार घेतलेला आहारच सात्त्विक मानला जातो. चुकीच्या दिनचर्येमुळे वाताचे ८०, पित्ताचे ४० आणि कफाचे २० प्रकारचे आजार निर्माण होतात, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहा यांनी आहार, विहार आणि विश्रांती यांचा योग्य समतोल साधण्याचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, जेवणानंतर त्वरित श्रम केल्यास आजार उद्भवतात. किमान १५ मिनिटांची वामकुक्षी आरोग्यास उपयुक्त ठरते.
योगाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, “योग म्हणजे जितेंद्रिय होय. आसन केवळ कसरत नसून ती आस नसलेली अवस्था आहे. प्राणायाम आणि आसन शास्त्रोक्त पद्धतीने केल्यासच आरोग्य लाभते, अन्यथा चुकीच्या पद्धती अपायकारक ठरतात.” त्यांनी कपालभाती ही प्राणायाम नसून शुद्धिक्रिया असल्याचे स्पष्ट केले.
योगगुरू अभिजीत शहा यांनी आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून एक जीवनशैली असल्याचे प्रतिपादन केले. “स्वतःची सेवा केली तरच निरोगी आरोग्य प्राप्त होते. आहार-विहार, श्रम, विश्रांती व सात्विक विचारांचा योग्य मेळ घातल्यास सामाजिक, मानसिक, आध्यात्मिक व शारीरिक आरोग्य संतुलित राहते,” असे ते म्हणाले.
या मार्गदर्शनातून उपस्थितांना उपयुक्त आणि व्यवहार्य माहिती मिळाली. व्याख्यानानंतर नागरिकांनी योगाभ्यास व आयुर्वेदीय दिनचर्या अंगीकारण्याचा संकल्प व्यक्त केला.
या समता योग मंदिरात सकाळी ६ :१५ ते ७:१५ या वेळेत योगासन आणि प्राणायमाची बॅच सतीश गुजराथी व महेश थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून इच्छुक महिला, पुरुषांनी पुढील बॅच साठी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सतीश गुजराथी यांनी केले.
कार्यक्रमात समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, समता महिला बचत गट अध्यक्षा व नगरपालिकेच्या माजी महिला नगराध्यक्षा सौ. सुहासिनी कोयटे, राजाभाऊ जगताप, शैलेंद्र कुलकर्णी, आबासाहेब भोकरे, बाळासाहेब शेंडगे, वैभव रक्ताटे ,चेतन कहांडळ, नंदकुमार जाधव यांचे सह असंख्य योग साधक, व आरोग्य विषयी जागरूक महिलावर्ग सहपरिवार उपस्थित होता.
या वेळी उपस्थितांनी समता परिवाराचे संस्थापक काका कोयटे यांनी योग भवनाचे पालकत्व स्वीकारल्यामुळेच आम्हाला निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची संधी मिळाल्याचे मनोगतातून व्यक्त करून त्यांचा सत्कार करून सन्मान केला. तसेच बहुमोल मार्गदर्शनाबद्दल योगगुरू अभिजीत शहा यांचा देखील सत्कार उपस्थितांच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सतीश गुजराथी यांनी केले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!