येसगाव विद्यालयात स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात
सौ.रेणुका कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
रयत शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव ता.कोपरगाव येथे स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. मुख्य पाहुण्या सौ. रेणुका कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, देशभक्तीपर कविता, गीते, नृत्य आणि कवायत सादर करून देशप्रेमाचा संदेश दिला.
या सोहळ्यात कै. गं. भा. पार्वतीबाई सुखदेव निकोले यांच्या स्मरणार्थ सौ. हिरा पांडुरंग चाफे यांच्या तर्फे विद्यालयातील एस.एस.सी. फेब्रु./मार्च २०२५ परीक्षेत प्रथम तीन क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांचा गौरव होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
यावेळी संजीवनी स्वयं सहाय्यता महिला बचत गटाच्या अध्यक्षा सौ. रेणुका विवेक कोल्हे यांनी मनोगत व्यक्त करून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच समाजकार्याची प्रेरणा दिली.
सोहळ्यास येसगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन सचिन कोल्हे, सरपंच पुंडलिक गांगुर्डे, उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य, शाळा समिती सदस्य, सल्लागार समिती सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तसेच गावातील मान्यवर, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक मुख्याध्यापक रंगनाथ ठाकरे यांनी करताना स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. आभार प्रदर्शन पर्यवेक्षिका सौ. जयश्री आंबरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख रामदास गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दीपक खालकर, शिवाजी भुतांबरे, कैलास पारधी यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
देशभक्ती, एकात्मता आणि स्वातंत्र्याचे मूल्य पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करून सोहळ्याचा समारोप झाला.






