भागिनाथ आसने यांनी आरंभ फाउंडेशनला दिल्या १० हजाराहून अधिक देशी बिया
पर्यावरणप्रेमी शेतकऱ्याचा स्तुत्य उपक्रम
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
निसर्गसंवर्धनासाठी बीजदानाच्या माध्यमातून आपले योगदान देणाऱ्या युवा शेतकरी भागिनाथ बाबासाहेब आसने (रा. ब्राह्मणगाव) यांनी पर्यावरण रक्षणाचा एक स्तुत्य आदर्श उभा केला आहे.
भागिनाथ यांनी २० जुलै रोजी, आरंभ फाउंडेशन (पिंपरी चिंचवड) या सामाजिक व पर्यावरण विषयक कार्यात अग्रेसर संस्थेला, १० प्रकारच्या देशी वृक्षांच्या एकूण १०,००० हून अधिक बिया सुपूर्त केल्या. हे बीजदान मित्र विवेक देशमुख यांच्या सपत्नीक हस्ते, संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वैष्णवी विनायक पाटील यांच्याकडे करण्यात आले.
या बियांमध्ये आंबा, बोर, चिंच, रामफळ, सिताफळ, कडुलिंब, बेलफळ, बकाण, करंज व बाभळी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये ४,००० सिताफळ, ३,००० बोर, व १,००० रामफळ या फळवृक्षांचे प्रमाण लक्षणीय आहे.
भागिनाथ आसने यांनी मागील तीन वर्षांपासून सामाजिक वनीकरण विभागास बीजदान करून आपली जबाबदारी निभावली आहे. मात्र, आरंभ फाउंडेशनला ही त्यांची पहिलीच भेट होती.
“मी गेल्या तीन वर्षांपासून संस्थेच्या बीज संकलन WhatsApp ग्रुपचा सदस्य आहे. इथूनच मला बीजांचे महत्त्व आणि माझी सामाजिक जबाबदारी समजली. केवळ झाड लावणेच नाही, तर बीज पुरवठा हाही एक मोठा भाग असतो,” असे मत भागिनाथ यांनी व्यक्त केले.
आरंभ फाउंडेशनने नुकतीच आषाढी वारीनिमित्त साडेतीन लाखांहून अधिक दुर्मिळ देशी बिया वारकऱ्यांना बीजप्रसाद स्वरूपात वितरित केल्या आहेत. संस्थेचे बीज संकलन, रोप निर्मिती, वृक्ष संवर्धन, प्लास्टिक पुनर्वापर, आणि जनजागृती असे विविध उपक्रम समाजभान जागवणारे ठरत आहेत.
भागिनाथ आसने यांचे हे योगदान समाजासाठी नक्कीच प्रेरणादायक आहे. अशा उपक्रमांतून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी एक सकारात्मक बदल घडतो आहे.





