रांजणगावमध्ये कुक्कुट पालक शेतकऱ्यांची कार्यशाळा संपन्न
कोपरगाव/ लक्ष्मण वावरे
बदलत्या हवामानाचा कुक्कुटपालन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. मात्र कुक्कुटपालनात प्रत्येक स्तरावर चांगले व्यवस्थापन केले तर सर्वच प्रकारच्या साथीरोगांसह इतर आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. यासाठी पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांनी आपल्या फार्मध्ये चांगले व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याची माहिती कुक्कुटपालन तज्ज्ञ डॉ. महेश पांचाळ यांनी दिली. ते रांजणगाव देशमुख, ता. कोपरगाव येथे झालेल्या पशुपालकांच्या कार्यशाळेत बोलत होते.
मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पांतर्गत पशुपालकांची मुल्यसाखळी विकास शाळा व प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. पशुसंवर्धन विभाग व सुरावी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेत मोठ्या संख्येने पशुपालक शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता.
कुक्कुटपालन व्यवसायातील नवीन तंत्रज्ञान यावर पोल्ट्री व्यवस्थापन तज्ज्ञ दीपक सोनवणे यांनी माहिती दिली. वाढते तापमान हे पोल्ट्री व्यवसायासाठी घातक ठरत आहे. तसेच सातत्याने घसरत चाललेला पाण्याचा दर्जा हे देखील पोल्ट्री व्यवसायाच्या मुळावर उठत असल्याने यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरणे हेच हिताचे राहणार असून त्यातूनच शेतकऱ्याला नफा मिळू शकतो असे दीपक सोनवणे यांनी सांगितले. तर पशुपालनात बेसुमार मुरघासाचा वापर ही चिंतेची बाब असून त्यामुळे गायांमध्ये स्तनदहासारखे वाढत असल्याची माहिती पशुधन अधिकारी डॉ. दिलीप दहे यांनी दिली. तर शेळ्यांमध्ये लसीकरण हे महत्त्वाचे असून पशुपालकांनी लसीकरण फाटा देऊ नये असा सल्ला पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप जामदार यांनी दिला. तर कार्यशाळेच्या निमित्ताने पशुपालक शेतकऱ्यांनी देखील आपल्या शंकाचे निरसन तज्ज्ञ डॉक्टरांकडून करून घेतले.
या कार्यशाळेचे सुत्रसंचालन सुरावी कंपनीचे संचालक सुखलाल गांगवे यांनी केले. तर कार्यशाळेसाठी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल तांबे, कोपरगाव पंचायत समितीच्या पशुधन विस्तार अधिकारी डॉ. श्रद्धा काटे, डॉ. श्रीकांत घोरपडे, डॉ. अरूण गव्हाणे, श्री. निलेश रोहम, मनेगावचे सरपंच अण्णासाहेब गांगवे आदी मान्यवर उपस्थित होते.





