येसगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी व रिंगण सोहळा उत्साहात
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
आषाढी एकादशीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल येसगावच्या वतीने गावामध्ये पारंपरिक व भक्तिभावपूर्ण वातावरणात दिंडी व रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
संपन्न झालेल्या या सोहळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन वारकरी परंपरेचे जिवंत दर्शन घडवले.
दिंडी सोहळ्यादरम्यान येसगाव गावातील दोन ठिकाणी विद्यार्थ्यांनी अभंगगायन व कीर्तन सादर करून संपूर्ण परिसर भक्तिमय भावनेने भारावून टाकला. विद्यार्थ्यांनी वारकरी वेशात तर विद्यार्थिनींनी केसरी साडी नेसून कपाळी टिळा लावून ‘विठ्ठलभक्ती’चे प्रतीक उभे केले.
शेवटी विद्यालयाच्या प्रांगणात भव्य रिंगण सोहळा पार पडला. दिंडीमध्ये स्थानिक वारकरी भजनी मंडळ, विद्यार्थ्यांचे अभंग, टाळ-मृदंगाचा निनाद, आणि विठ्ठल नामस्मरण यामुळे संपूर्ण परिसर हरिभक्तीने न्हालेला होता.
या प्रसंगी येसगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन सचिन कोल्हे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य किरण गायकवाड, स्थानिक सल्लागार समिती सदस्य अतुल सुराळकर, तसेच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ, पालकवर्ग उपस्थित होता.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक . रंगनाथ ठाकरे , पर्यवेक्षिका सौ. जयश्री आंबरे, कलाशिक्षक दीपक खालकर, . शिवाजी भुतांबर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन रामदास गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेमध्ये शाळेतील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच ह.भ.प. सागर चव्हाण व निलेश चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले.
या अनोख्या भक्तिमय सोहळ्यात विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष दिंडीचा अनुभव घेतला, वारकरी परंपरेशी आत्मीयतेने नाते जोडले आणि ‘माउली-माउली’ च्या जयघोषात समाजात आध्यात्मिक संस्काराचे बीज पेरले गेले.





