येसगाव येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल येसगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील उपशिक्षिका श्रीमती प्रियंका चाबुकस्वार होत्या.
राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजण मुख्याध्यापक रंगनाथ ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले,
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री ठाकरे यांनी शाहू महाराजांच्या शैक्षणिक, सामाजिक व सामाजिक न्यायाच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या कार्याचा आजच्या काळातील संदर्भात उल्लेख केला. त्यांनी विद्यार्थ्यांना समतेचे आणि शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
अध्यक्षीय मनोगतात श्रीमती चाबुकस्वार यांनी शाहू महाराजांनी समाजातील मागासवर्गीय व वंचित घटकांसाठी राबवलेले विविध उपक्रम, शिक्षण प्रसाराचे योगदान व समता, बंधुता या मूल्यांची उजळणी केली. त्यांचा इतिहास हा फक्त गौरवशाली नसून, आजही प्रेरणादायी आहे, असे म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख रामदास गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन विद्यार्थिनी प्रतिक्षा पाईक व ईश्वरी सुराळकर यांनी करत. सई खोकले हिने आभार मानले.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करून, सामाजिक समतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी ठरला




