banner ads

कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या घटनेची शहनिशा करून दोषींवर कारवाई करा - आ. आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या घटनेची शहनिशा करून दोषींवर कारवाई करा - आ. आशुतोष काळे


कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
 कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेला पुढील उपचारार्थ दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रुग्णवाहिका सेवा देण्यात हलगर्जीपणा करण्यात आला असल्याची माहिती प्रसिद्धी माध्यमातून समोर आली आहे. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात रुग्ण सेवेच्या बाबतीत जर असे प्रकार होत असेल तर ते अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या घटनेची शहानिशा करून आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांना केल्या आहेत.

 कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात मोफत उपचार होतील या आशेवर आलेल्या गर्भवती महिलेची तपासणी केल्यानंतर त्या महिलेला पुढील उपचार करण्यासाठी लोणी येथील रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. परंतु त्या महिलेला लोणी येथील रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णवाहिकेला फोन करण्यास परिचारिकेने असमर्थता दर्शवून मी फोन लावणार नाही असा पवित्रा घेतला. रुग्णालयाच्या इतर कर्मचाऱ्यांनी देखील उडवा उडवीची उत्तरे देवून रुग्णवाहिका उपलब्ध असतांना देखील त्या गर्भवती महिलेला वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाकडून दिरंगाई करण्यात आली. त्यामुळे अंत्यवस्थ असणाऱ्या त्या गर्भवती महिलेला व तिच्या पतीला मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अशा आशयाच्या बातम्या विविध प्रसिद्धी माध्यमांनी प्रसिद्ध केल्या होत्या.

त्या बातम्यांची आ.आशुतोष काळे यांनी दखल घेवून जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्याशी संपर्क करून त्यांना या घटनेची शहनिशा करून व सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाने आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करावी. कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत प्रसिद्ध झालेल्या बातम्यातून रुग्णांना आरोग्य सेवा देतांना ग्रामीण रुग्णालय प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे यापुढील काळात नागरीकांच्या तक्रारी येणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी तंबी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला दिली 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!