संवत्सरगांवातील शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई होणार - परजणे
संवत्सरला लवकरात लवकर पोलिस चौकी सुरु करावी
कोपरगांव (लक्ष्मण वावरे )
संवत्सर गावाला पौराणिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेला असल्याने गावातील विविध जाती धर्माचे लोक एकोप्याने व सलोख्याने नांदत असताना काही ठराविक नतद्रष्ट लोकांकडून गावातील जातीय सलोखा व शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा लोकांकडून यापुढे असा प्रयत्न झाला तर कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील यांनी दिला.
संवत्सर गावातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नासंदर्भात राजेश परजणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. २ मे रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. या सभेत ते बोलत होते. शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस उपाधीक्षक श्री वमने, कोपरगांव ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संदीप कोळी, पोलिस उपनिरीक्षक श्री पवार, ठाणे अंमलदार श्री तमनर, सरपंच सुलोचना ढेपले, उपसरपंच विवेक परजणे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत होती.
आपल्या भाषणातून राजेश परजणे पाटील यांनी गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून संवत्सर गावची संस्कृती टिकून असून गावामध्ये शांतता असल्याचे नमूद केले. परंतु गेल्या काही दिवसापासून गावामध्ये अशांतता व दहशत निर्माण करण्याचे काम काही नतद्रष्ट लोक करीत आहेत. शाळेचा परिसर तसेच गावातील चांगल्या वाड्या वस्त्यांमध्ये दारू व्यवसाय, मटका, जुगार असे व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत. यासंदर्भात पोलीस विभागाला सांगून देखील कोणतीही कारवाई होत नाही. परिणामी हे गैरप्रकार मोठ्या प्रमाणावर फोफावत चालले आहेत. गावातील शांतता व सलोखा या प्रकारामुळे भंग पावत आहे. गावामध्ये काही तरुण वेगवेगळ्या शस्त्रांचा वापर करून दहशत व भांडणे निर्माण करतात. जेलमधून बाहेर आलेल्या व्यक्तीची गावात मिरवणूक काढून गांवातील वातावरण दुषित करतात. अशा प्रकारामुळे चांगल्या तरुणावर वाईट संस्कार घडत आहेत. कोपरगांव तालुक्याला यापूर्वी गोविंद पवार, यादवराव पाटील, कृष्ण प्रकाश, प्रकाश कवडे, मानगांवकर असे धाडसी व कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी लाभले होते. त्यांच्या काळात कोणत्याही मोठ्या दंगली अथवा वाईट प्रकार घडलेले नाहीत. सद्याच्या काळात मात्र पोलिस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. तशा तक्रारी लोकांमधून येत आहेत. पोलिस स्टेशनला एखादा माणूस तक्रार नोंदविण्यासाठी गेला तर त्याची फारशी दखल घेतली जात नाही. त्याला न्याय मिळत नाही. आमच्या संवत्सर गांवातील एकोपा व सलोखा आबाधित राहण्यासाठी सर्व जाती धर्माचे व विविध पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ राजकीय जोडे बाजुला ठेऊन आज एकत्र आलेले आहेत. याची दखल घेऊन पोलिस विभागाने आमच्या संवत्सर गांवातील वातावरण दुषित करणाऱ्या गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी कठोर कारवाई करावी.
पोलिसांकडून जर कारवाई होणार नसेल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असेही श्री परजणे पाटील यांनी आपल्या भाषणातून सांगितले. संवत्सरगावाचा परिसर मोठा असल्याने गांवात सतत काहिना काही गैर प्रकार घडतच असतात. यासाठी संवत्सरला पोलीस चौकी सुरु करण्यासाठी आम्ही जागेची देखील व्यवस्था करून देत आहोत याची दखल घेऊन संवत्सरला लवकरात लवकर पोलिस चौकी सुरु करावी अशीही मागणी त्यांनी केली.
माजी सरपंच चंद्रशेखर देशमुख, ॲड. लोहकणे, मधुकर साबळे, राजेंद्र लोखंडे, अशोकराव थोरात यांचीही यावेळी भाषणे झाली
शिर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस उपाधीक्षक श्री वमने यांनी उत्तर देताना आमची पोलीस यंत्रणा गुन्हेगारी चळवळीसाठी कोणासही पाठीशी घालणार नाही. गुन्हेगारी लोकांचा आम्ही बंदोबस्त करू. त्यांना तडीपार करण्याचे गुन्हे दाखल करू यापुढे आमची यंत्रणा सतर्क राहील. कायद्यामध्ये अनेक बदल झाल्यामुळे निर्णय घेणे पोलिस यंत्रणेला कधी कधी अवघड होते तरीसुद्धा अनेक गुन्हेगारास आम्ही अटक केलेली असून गावात दहशत पसरविणाऱ्या लोकांचा सुद्धा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन दिले.
सभेला पोलीस पाटील लीनाताई आचारी, चंद्रकांत लोखंडे, दिलीपराव ढेपले, शिवाजीराव गायकवाड, लक्ष्मणराव साबळे, सोमनाथ निरगुडे, तलाठी श्रीमती वाडेकर, कृषी अधिकारी श्रीमती कांबळे मॅडम, विद्युत वितरणचे अधिकारी श्री बोंडखळ, तुषार बाराहाते, ज्ञानदेव कासार, अनिल आचारी, मधुकर साबळे, सुभाष लोखंडे, ज्ञानदेव पावडे, संभाजीराव भोसले, अविनाश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, संजय भाकरे, बाबुराव मैद, बापू तिरमखे, ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत आहिरे, लक्ष्मणराव परजणे, महेश परजणे, शेखर देशमुख, माजी पोलिस अधिकारी श्री लोखंडे, दिलीप बोरनारे व संवत्सर पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार मानले.






