banner ads

खूरपं' हीच डिग्री स्व. ताराबाई जपे

kopargaonsamachar
0

 

खूरपं' हीच डिग्री स्व. ताराबाई गणपत जपे

शेतमजूर ते कार्यक्षम नगरसेविका थक्क करणारा प्रवास


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
लहान असो की थोर सर्वांसाठी त्या अक्काचं होत्या. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या खुलताबाद येथील देशमुख कुटुंबात अक्कांचा जन्म झाला. दुष्काळ, नापिकीला कंटाळून देशमुख कुटुंब कोपरगाव तालुक्यातील खडकी येथे विस्थापित झालं. चार भावंडांच्या परिवारात अक्का वयानं सर्वात मोठ्या होत्या. खडकीतीलचं जपे परिवारात अक्कांची लग्नगाठ जुळली. एकप्रकारे खडकी हेच अक्काचं माहेर आणि सासर बनलं.
अक्कांनी शाळेची पायरी कधी चढली नाही. मात्र, अक्कांचं मॅनेजमेंट कौशल्य एखाद्या एमबीए पदवीधराला लाजवणारं होतं. 'खूरपं' हीच माझी डिग्री असं अक्का नेहमी म्हणायच्या. याचं खुरप्याच्या जोरावर अक्कांनी शेकडो महिलांची मोट बांधली. त्यांना संघटित केलं. रोजगारातून आर्थिक आधार दिला. हेच खुरपं त्यांना कोपरगाव नगरपरिषदेत नगरसेवक पदापर्यंत घेऊन गेलं.

खडकी हे कोपरगाव शहराचं सर्वात वरचं टोक. हातावर प्रपंच असणाऱ्या माणसांचं एक छोटं गावचं जणू. खडकीला लागूनच सधन बागायती पट्टा होता. शेकडो एकर जमिनीचे मालक असलेले बागायतदार होते.  शेतकामासाठी मनुष्यबळाची गरज भासत असे. अक्कांनी नेमकी गरज हेरली. शेतकामासाठी महिलांची टोळी बांधली. टाकळी, ब्राह्मणगाव, रवंदा, येसगाव तर कधीकधी येवला पर्यंत शेत कामाची मागणी यायची. अक्का टोळी घेऊन हजर व्हायच्या.
एखाद्या आठवड्यात दोन-तीन ठिकाणी बोलावणं आल्यास अक्का महिलांची विभागणी करायच्या. कुणाचं काम खोळबांयचं नाही. दर सोमवारी अक्कांच्या घरी जणू महिलांचा दरबार भरायचा. सर्वांच्या घामाला योग्य दाम मिळावा म्हणून जातीनं लक्ष घालून अक्का पगाराचे वाटप करायच्या. हजारो रुपयांचे व्यवहार अक्कांनी अगदी सहजपणे केले. काम घेण्यापासून ते पगाराचे वाटप करेपर्यंत अक्कांच्या  मॅनेजमेंट कौशल्याचं दर्शन घडायचं.
चार भिंतीतल्या संसारासोबत अक्कांनी अनेकांचे संसार फुलविले. महिलांना आर्थिक सक्षम बनवलं. खडकी परिसरातील वयस्कर, निराधार महिलांना अक्का म्हणजे आधाराचं ठिकाण वाटायचं. खरंतर, पतींच्या निधनानंतर अक्कांनी तिन्ही मुले, दीर यांचा सांभाळ केला. कष्ट, त्याग आणि समर्पणातून अक्का जपे परिवाराच्या आधारवड ठरल्या. 
संघटन कौशल्य हे अक्कांकडे उपजत होते. त्यांनी स्वार्थ न पाहता सुख-दु:खाला धावून गेल्या. नगरपालिका निवडणुकीत खडकी प्रभागातून नगरसेवक पदासाठी नावांची चर्चा सुरू झाली. सर्वांना उपलब्ध असलेला, सुख-दु:खात सहभागी असणाऱ्या चेहऱ्याचा शोध सुरू होता. तेव्हा नगरसेवक पदासाठी सर्वार्थानं अक्कांचा चेहरा योग्य असल्याचं कोल्हे परिवार आणि खडकी परिसराचं एकमत झालं. नगरपालिका निवडणुकीत अक्का मोठ्या मताधिक्यानं निवडून आल्या. 
कोपरगाव नगरपरिषदेचं नगरसेवक अक्कांनी भूषविणं हा जपे परिवाराच्या आयुष्यातील सुवर्णक्षण होता. नगरपरिषदेच्या कामकाजात अक्का आत्मविश्वासाने सहभागी व्हायच्या. सर्वात ज्येष्ठ आणि समाजजीवनाचा अनुभव असलेल्या सदस्य म्हणून नगरपालिका वर्तृळात अक्कांकडं पाहिलं जायचं. त्यांच्या ज्येष्ठत्वाचा सन्मान म्हणून तीन दिवसांचं मानद नगराध्यक्षपद अक्काकडं सोपविण्यात आलं. 
नगरपालिकेची सर्वसाधारण सभा असो किंवा नियमित कामकाजात नगरसेवकांची सही लागायची. सही करण्यासाठी अक्कांपुढे शाईचा पॅड पुढं केला जायचा. एवढ्या सह्यांमध्ये आपलाच अंगठा कसा? अक्कांच्या मनाला खटकायचं. अक्कांनी जिद्द धरली आणि खूरप धरलेल्या हातांत पेन आला. अक्कांनी मूलं-नातवांकडून साधी-सोपी सही बनवून घेतली. सहीचा दररोज सराव केला. अक्का सही कागदावर उतरविण्याचा प्रयत्न करू लागल्या.
अक्कांचा थेट खालच्या थरापासून जनसंपर्क असल्याने त्यांना प्रश्नांची जाण होती. अक्कांनी आपल्या कार्यकाळात प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक झाले म्हणून अक्कांनी आपलं मूळ सोडलं नाही. नगरसेवक झाल्यानंतर शेतकामासाठी जाऊ नये असा कुटुंबाचा आग्रह अक्कांनी मानला नाही. निराधार- ज्येष्ठ महिलांना कामं मिळाली नाही तर त्यांची चूल पेटणार नाही असं अक्काचं म्हणणं असायचं. 
शेत मजूर ते कार्यक्षम  नगरसेविका असा टप्पा अक्कांनी गाठला होता. अक्कांनी आयुष्यात अनेक संकट, वादळ झेलली. पण कधी हार मानली नाही. मात्र, अक्कांना अकालीचं काळानं गाठलं. काळापुढं सारं काही शून्य आहे. अक्कांचे संघटन, नेतृत्व, समाजस्नेही वृत्तीचा वारसा त्यांचे चिरंजीव श्री. दीपक (दादा), श्री. मारुती (आबा), श्री. निवृत्ती (पाटीलबाबा) समर्थपणे पुढे नेतील.
अक्का जरी देहरुपानं आपल्यात नसल्या. तरी आपल्या कामातून, त्यांनी जपलेल्या माणसातून काल, आज आणि उद्याही जिवंत राहतील. अक्कांचा हसरा चेहरा सर्वांना कायम आशीर्वाद देत राहिल. 
अक्कांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!

 शब्दांकन- अनंत बर्गे

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!