खोटं उठून दिसतं आणि खरं झाकलेलं राहतं - साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
सर्वांच्या डोळयावर कलीयुगामुळे मायेची झापड निर्माण झाली आहे, माया माणसाचं नुकसान करते, आपल्या आजुबाजुला निंदा करणारे मंबाजीबुवांची मोठया प्रमाणांत संख्या आहे. खोटं उठून दिसतं आणि खरं झाकलेलं राहतं. निंदा पचविता येते पण स्तुती पचविणे अवघड, आईने आपल्या मुलांना संस्काराची शिकवण द्यावी असे प्रतिपादन साध्वी अनुराधादिदी पंढरपुरकर यांनी केले.
येथील संत ज्ञानेश्वरनगरी तहसिल कार्यालय मैदानावर मुंबादेवी तरूण मंडळ साईगांव पालखीच्यावतीने श्री शिवमहापुराण कथा सोहळयाचे आयोजन करण्यांत आले असुन त्याचे तिसरे पुष्प गुंफतांना त्या बोलत होत्या. राघवेश्वर देवस्थान कुंभारीचे महंत राघवेश्वर महाराज यांनी अनुराधादिदी यांचा सत्कार केला.
साध्वी अनुराधादिदी पुढे म्हणाल्या की, क्रोधामुळे अनेकांचे नुकसान होते त्यावर विजय मिळवा. संत मानवाला संस्कार आणि धर्माशी जोडुन ठेवतात. आयुष्य वृध्दीसाठी (दुर्वा) शत्रुनाश (जास्वंद), मनोकामना (बेलपत्र), अन्नपुरवठा (जुई फुले) एक लक्ष प्रमाणांत भगवान शंकराला अर्पण केल्यांने पुण्य वाढते. वंश विस्तारासाठी (शुध्द तुप), बुध्दीहिन-मन उदास नकारात्मकता-घरातील कलह दुर होण्यासाठी (गोड दुध), क्षयरोग नाशासाठी (मध), मोक्षप्राप्तीसाठी जलाचा अभिषेक करावा. भस्म त्यागाचे वैराग्याचे प्रतिक आहे म्हणून सर्वांनी कपाळी लावावा. देवघरात उजव्या बाजुला शुध्द तुपाचा तर डाव्या बाजुला तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. भगवान शंकराचा सखा कुबेर आहे. मद्यपान, व्याभिचार, मासांहार आणि जुगारापासुन दुर रहा, सत्कर्माला प्राधान्य द्या. पाषाण लिंग तुळशीत तर धातुचे लिंग देव्हा-यात असावे असेही त्या म्हणांल्या.
शहरातील समाजकारणी, राजकारणी, विधीज्ञ, सराफ व्यावसायिक, उद्योजक, छपाई व्यवसायातील तज्ञ आदिंच्या हस्ते आरती करण्यांत आली. लक्ष्मी-नारायणाच्या पात्रांची यावेळी सजावट करण्यांत आली होती. कार्यक्रमस्थळी शिवलिलामृताचे पारायण करण्यांत आले.
[ मुलींनी आई वडीलांशी कसे वागावे या विषयावर वसंत हंकारे यांचे व्याख्यान कलश मंगल कार्यालय, कोपरगाव येथे गुरूवारी सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यांत आले असुन त्यास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुंबादेवी तरूण मंडळाच्या वतीने करण्यांत आले. सहा हजार महिलांनी शिवजागर जपात सहभाग नोंदविला आहे.]




