अंकिताच्या स्वप्नवत भरारीला संजीवनीचे पंख
गावातली मुलगी थेट टोकियोच्या मेट्रो साईटवर,
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शेतकऱ्याच्या घरात जन्म, जिल्हा परिषद शाळेत शिक्षण आणि थेट जपानच्या टोकियो शहरात मेट्रो प्रकल्पावर साईट इंजिनियरची जबाबदारी! लहानशा गावातून उंच भरारी घेणं हे स्वप्न वाटतं, पण ती भरारी खरंच घेणाऱ्या काही जिद्दी व्यक्ती असतात. अशाच जिद्दीची, मेहनतीची आणि ध्येयाने पेटलेल्या वाटचालीची प्रेरणादायी कहाणी आहे शिरवाडे वाकद येथील कु.अंकिता संतोष काकड हिची.
आईवडिलांना मुलगी पोलीस व्हावी असं वाटत होतं, पण अंकिताच्या मनात काहीतरी वेगळंचं चाललं होतं. आपली ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करायची. आणि तिने ते करूनही दाखवलं. आज ती जपानमधील टोकियो शहरात, मेट्रो रेल प्रकल्पावर साईट इंजिनियर म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
गावातील जिल्हा परिषद शाळेतून शिक्षणाची सुरुवात, कोपरगावच्या संजीवनी इंजिनियरींग काॕलेज मधुन स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगपर्यंतचा प्रवास आणि त्यातून थेट जपानमध्ये मोठ्या पदावर निवड. अंकिताची ही वाटचाल म्हणजे स्वप्न, अभ्यास, चिकाटी आणि धैर्य यांचं उत्तम उदाहरण. जगदीश शिंदे यांच्याकडून ऑनलाइन माध्यमातून जपानी भाषा आत्मसात करत, डॉ. ए.एस. सय्यद, अतुल मोकळ व सुधीर गायखे यांच्या मार्गदर्शनाखाली अंकिताने जपानी ‘ओपन अप कन्स्ट्रक्शन’ या नामांकित कंपनीत साईट इंजिनियर म्हणून जागा मिळवली आहे. मेट्रो प्रकल्पात काम करताना तिला राहण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, वाहन आणि तब्बल १८ लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळणार आहे. तीन महिन्यांचे विशेष प्रशिक्षण भारतातच होणार असून त्यासाठी जपानमधून तज्ञांचे पथक येणार आहे. आपल्या मुलीने पोलिस व्हावे असे स्वप्न पाहणाऱ्या वडिलांच्या आकांक्षांना नवी दिशा देत, त्या स्वप्नाला आंतरराष्ट्रीय कर्तृत्वाची किनार देणारी अंकिता ही नव्या पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.अंकिताच्या
या यशा बद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी तिचे व तिच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.
◆ अंकिता पोलीस अधिकारी होईल हे आमचं स्वप्न होतं. मात्र, तिच्या मनाच्या ठरलेल्या मार्गावर तिनं चालायला सुरूवात केली आणि आज ती जागतिक पातळीवर यशस्वी झाली आहे. आम्हाला तिचा गर्व आहे, तिच्या यशात तिच्या मेहनतीचं योगदान मोठं आहे.
- संतोष काकड
वडील
◆ माझ्या यशामध्ये कुटुंबाचं आणि शिक्षकांचं अनमोल योगदान आहे. कुटुंबाची साथ आणि शिक्षकांचं मार्गदर्शन यामुळेच मी आज इथे आहे. माझ्या पालकांना मी पोलिस व्हावं अशी इच्छा होती, मात्र ते प्रत्येक पावलावर माझ्या निर्णयांचा आदर करत मला ध्येय प्राप्त करण्यासाठी प्रेरणा देत होते. आवड असलेले ध्येय मोठे असले तरी ते साध्य करण्यासाठी जिद्द आणि मेहनत दोन्ही महत्त्वाचे आहेत. कोणत्याही परिस्थितीत हार मानू नका. आपल्या स्वप्नांच्या मागे जाण्याची क्षमता तुमच्यात आहे. केवळ विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे जा.
- अंकिता काकड
◆ जिल्हा परिषद शाळेतून शिकून जपानपर्यंत पोहोचणं ही केवळ तिचीच नव्हे तर संपूर्ण गावाची शान आहे. ही गोष्ट इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा देणारी आहे. अंकिताची ही यशोगाथा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ ठरावी अशीच आहे. तिच्या या प्रेरणादायी यशामुळे 'शिरवाडे वाकद' चं नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलं आहे.
- डॉ.श्रीकांत आवारे
सरपंच




