विज वितरण अधिकाऱ्यानेच पन्नास हजाराची मागणी केल्याची वायरमनची जनता दरबारात तक्रार
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
जनता दरबारात नागरिकांच्या प्रत्येक विभागाच्या समस्या मांडण्यासाठी येणाऱ्या अडचणींची दखल घेवून विविध शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत आ.आशुतोष काळे विविध शासकीय विभागाचे स्वतंत्रपणे जनता दरबार घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी तहसील कार्यालय कोपरगाव येथे महावितरण, राज्य परिवहन महामंडळ,रेल्वे विभाग व पोलीस प्रशासन आदी विभागाच्या संदर्भात असलेल्या नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी जनता दरबार घेतला. यावेळी उपस्थित महावितरण विभागातील अधिकाऱ्यांसमोरच विजवीतरणमध्ये वायरमन असलेल्या कर्मचाऱ्यानेच शहर अभियंत्यावर ५० हजार रुपये लाच मागितल्याची तक्रार अधिकारी व आमदार मोहोदयांसमोरच केल्याने जनता दरबारात एकच खळबळ उडाली आणि संबंधित जनता दरबारात उपस्थित असलेल्या त्या अधिकाऱ्याची एकच तारांबळ उडाली.
या बाबतीत अधिक माहिती अशी की,बाजार समिती परिसरात बुद्ध विहार च्या मागील बाजूला राहणाऱ्या वृद्ध महिलेने आपल्या झोपडी वरील विजेच्या तारा व तेथील पोल हटवण्याची मागणी केली होती. पोल शिफ्ट करण्यासाठी संबंधित अभियंत्याने लाच मागितली असल्याचे सदर महिलेने तक्रार केली त्यानंतर या महिलेचा महावितरण विभागात वायरमन असलेल्या (मुलाने) कर्मचाऱ्यांने ही अभियंत्याने पैसे मागितल्या चे सांगितले त्यामुळे जनता दरबारात एकच खळबळ उडाली,, यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी सदर अभियंता यांना नोटीस काढून सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश विज वितरण विभागाला दिले .
[ या तक्रारी संदर्भात विज वितरणच्या त्या अभियंत्याची प्रतिक्रिया घेतली असता सदर अभियंत्याने सांगितले की माझ्यावर केलेले आरोप हे खोटे असुन वरिष्ठ अधिकारी व तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना याबाबत लेखी खुलासा करणार असल्याचे सांगितले आहे.]
जर संबंधित विभागातील कर्मचाऱ्याकडूनच अधिकारी पैसे मागत असतील तर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील या घटनेवरून दिसून येत असल्याची चर्चा जनता दरबारात नागरिकांमध्ये होती





