वाळू तस्करांना दणका! अवैध वाळू उपसा व वाहतूक करणारे ४ साधनांसह एक कोटीचा मुद्देमाल जप्त
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील धारणगाव शिवारात गोदावरी नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उत्खनन करून त्याची अवैध वाहतूक करणाऱ्यांना महसूल प्रशासनाने चांगलाच दणका दिला असून दोन टिप्पर एक ट्रॅक्टर आणि एक जेसीबी मशीनसह एकूण एक कोटी बारा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी धारणगाव शिवारातच वनविभागाच्या जमिनीत वाळू साठा आढळल्याने तहसीलदार महेश सावंत यांनी कारवाई केली होती. आणि पुन्हा त्याच शिवारात अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणारी वाहने मिळून आल्याने कोपरगाव चे तहसीलदार महेश सावंत आणि शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर यांच्या पथकाने संयुक्तरीत्या कारवाई करत सदरची वाहने जप्त करून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
कोपरगाव तालुक्यात गोदावरी नदी पात्रातून बेसुमार अवैध वाळू उपसा सुरू आहे. फरांड्यांच्या साहाय्याने वाळू उपसा करून चोरटी वाहतूक केली जात आहे.
महसूल प्रशासनाच्या वतीने या वाळू तस्कारांवर कारवाया होत आहेत मात्र काही दिवसांनी पुन्हा जैसे थे परिस्थिती होताना दिसत आहे. धारणगाव, माहेगाव देशमुख, मायगाव देवी, सोनारी, सुरेगाव, अशा अनेक ठिकाणी रात्रीच्या सुमारास बेसुमार वाळू उपसा होत असून रात्री अपरात्री वाहने चालू असल्याने परिसरातील ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. वाळू तस्करीतून अधिकचा पैसा मिळत असल्याने तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. त्यामुळे गुन्हेगारी वाढण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. अनेक ठिकाणी वाळूची वाहने वेगाने जात असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे. ही सर्व परिस्थिती पाहता महसूल विभागासह पोलीस प्रशासनाने देखील अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या विरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज निर्माण झाली आहे.




.jpg)




