सार्वजनिक बांधकाम कंत्राटदारांचा १ मार्चपासून काम बंदचा इशारा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शासकीय कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांची रक्कम फेब्रुवारी २०२५ अखेर अदा करण्यात यावी अन्यथा १ मार्च २०२५ पासून सर्व कामे बंद ठेवण्यात येतील अशा आशयाचे निवेदन अहिल्यानगरच्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाने सार्वजनिक बांधकाम संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
संगमनेरचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे यांना संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे २०२४-२५ या आर्थिक वर्षात हजारो कोटीची कामे मंजूर केली परंतु या कामांची लेखाशीर्षामध्ये आर्थिक तरतूद केली नाही. त्यामुळे शासकीय कंत्राटदारांनी केलेल्या कामाची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोट्यावधी रुपयांची देयके प्रलंबित आहेत याप्रकरणी देयकां पोटी किमान ७० टक्के रक्कम तातडीने वितरित करावी अन्यथा एक मार्च पासून सर्व विकासकामे बंद ठेवण्यात येतील असा इशारा देण्यात आला आहे .सर्व कंत्राटदार कामे अर्धवट सोडतील आणि त्यामुळे काही कामावर अपघात घडला किंवा जनतेचा उद्रेक झाला तर त्यास शासन जबाबदार राहील असेही निवेदनात म्हटले आहे .यावेळी महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष अनिल सोनवणे यांचे वतीने जिल्हा चेअरमन दीपक दरे यांचे सहीचे निवेदन कंत्राटदार एस. के .येवले ,आर. व्ही .कलापुरे ,पि.डी. आहेर, संकेत काकडे ,उमेश राहणे ,गणेश दिघे, योगेश गाडे यांनी दिले.





