शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदान तात्काळ वर्ग करा - आ.आशुतोष काळे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
राष्ट्रीय कृषी विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनांच्या अनुदानापासून कोपरगाव तालुक्यातील ८४२ शेतकरी वंचित राहिले आहे.शेतकर्यांनी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करूनही त्यांचे अनुदान आजपर्यंत त्यांना मिळालेले नाही.त्यामुळे ‘राष्ट्रीय कृषी विकास योजना’ व ‘मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचे’ अनुदान तातडीने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करा अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी राज्याच्या कृषी आयुक्तांना दिलेल्या पत्रात केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या पत्रात आ. आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, शेती सिंचनासाठी पाण्याचा काटेकोरपणे वापर होवून ठिबक सिंचनात वाढ व्हावी व शेतीचा विकास व्हावा या उद्देशातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या मार्फत शासनाच्या वतीने कोपरगाव मतदार संघात राष्ट्रीय कृषी विकास योजना व मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना प्रभावीपणे राबविली जात आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांनी सहभागी होवून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली होती. परंतु या योजनेच्या जवळपास १०२७ शेतकऱ्यांपैकी केवळ १८५ शेतकऱ्यांनाच ३२ लाख ३२ हजार ६३५ रुपयांचे अनुदान मिळाले आहे. मात्र सदरच्या अनुदानापासून ८४२ शेतकरी अजूनही वंचित राहिले आहेत.
या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या मार्फत केंद्र सरकार "राष्ट्रीय कृषी विकास योजना" अंतर्गत ५५ टक्के अनुदान अदा करते तर राज्य सरकार "मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना" अंतर्गत २५ टक्के अनुदान देते. दोन्ही मिळून शेतकर्यांना ठिबक सिंचना करिता एकूण ८० टक्के अनुदान मिळते. त्यासाठी शेतकऱ्यांना एका एकरासाठी अगोदर अंदाजे ६० ते ७० हजार रुपये खर्च करावा लागतो व त्यानंतरच सदरचे अनुदान ऑनलाईन स्वरुपात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते.



.jpg)




