जिल्ह्यात 'मिशन १०० दिवस' ७ कलमी कार्यक्रमास सुरुवात ;- जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
लोकांच्या शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक राहून मिशन १०० दिवस उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिल्या. या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या सोयीसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि उद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहन यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना असलेल्या ७ कलमी कार्यक्रमांची 'मिशन १०० दिवस' अंतर्गत अंमलबजावणीसाठी पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर सालविठ्ठल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे आदी उपस्थित होते.
सर्व विभागप्रमुखांनी सात मुद्द्यांवर काम करण्याबाबतच्या सूचना देताना जिल्हाधिकारी श्री.सालीमठ म्हणाले, प्रत्येक विभागाने आपल्या संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करावी, जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळ अधिक माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर द्यावा.
नागरिकांना ऑनलाइन सुविधांचा जलद लाभ घेता यावा, यासाठी संकेतस्थळ नसलेल्या विभागांनी अद्ययावत संकेतस्थळांची निर्मिती करावी. 'इज ऑफ लिव्हिंग' या संकल्पनेवर नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी विविध सेवांचे सुसूत्रीकरण व सरळीकरण करण्यात यावे. 'सुंदर माझे कार्यालय' या संकल्पनेअंतर्गत शासकीय विभागातील प्रत्येक कार्यालय स्वच्छ, सुटसुटीत, आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवावी, यासाठी कार्यालयीन अभिलेख अद्ययावत करण्यात यावे. अनावश्यक साहित्य निर्लेखित करण्यात यावे.
नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी करण्यावर भर द्यावा, यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतींचा वापर करावा. नागरिकांच्या तक्रारी व अर्जांवर सात दिवसांच्या आत निराकरण करण्यात यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या.
कार्यालयात नागरी सुविधा पुरविण्यात याव्यात, यामध्ये शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, कार्यालयातील स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवणे, अभ्यागत कक्ष निर्माण करावा, कार्यालयाची रंगरंगोटी व सुशोभीकरण यावर भर देण्यात यावा. अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष ठेवावे, दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावा, तसेच क्षेत्रीय भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्यात यावा, अशा सूचना ही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तातडीने सर्व परवाने संबंधितांना उपलब्ध करून देण्यात येतील. उद्योजकांची कुठेही अडवणूक होणार नाही, यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.








