सोनेवाडी शाळा जिल्ह्रयात अव्वल राज्यस्तरावर झाली निवड
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुणवत्तेबरोबरच विविध उपक्रमात अव्वल ठरत आहे.
संगमनेर येथे झालेल्या जिल्हास्तरीय हॅकेथॉन प्रदर्शनात पटकावला प्रथम क्रमाक मिळवून राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी या शाळेची निवड करण्यात आली.
प्रसिद्ध लेखक प्राध्यापक शिव खेरा असं म्हणतात की विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी याचा प्रत्येय या हॅकेथॉन प्रदर्शनात घेतला. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेल्या अगदी साध्यासुध्या आणि आगळेवेगळ्या मॉडेलने सर्वांचे लक्ष वेधले आणि हा इतिहास रचत आकाशाला गवसणी घातली. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेर चे प्राचार्य डॉक्टर राजेश बनकर, लक्ष्मण सुपे, डॉ गणेश मोरे, अनिल सातपुते यांच्या हस्ते विद्यार्थी व मार्गदर्शक बजरंग भागवत यांचा सन्मान करण्यात आला.
हॅकेथॉन हा एक स्पर्धात्मक कार्यक्रम आहे. विशिष्ट समस्या सोडवण्यासाठी किंवा नवीन संधी ओळखण्यासाठी इथे स्पर्धक एकत्र येऊन एकमेकांशी संवाद साधतात आणि आपल्या नवनिर्मितीचे सादरीकरण करतात. ज्यातून तुम्हा आम्हाला भेडसावणाऱ्या काही समस्या सोडवण्यासाठी मदत होत असते.
सोनेवाडी शाळेतील इयत्ता सहावीचे विद्यार्थी साई विकास अल्हाट व ओंकार गोरक्षनाथ गुडघे या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या "जीव वाचवणारा शर्ट" या मॉडेलची या वर्षी राज्यस्तरीय हॅकेथॉन प्रदर्शनासाठी निवड ही शाळेसाठी तसेच गावासाठी अत्यंत गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे. 20 जानेवारी 2025 रोजी संगमनेर येथील ज्ञानमाता विद्यालय येथे हे जिल्हास्तरिय हॅकेथॉन प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनात जिल्हाभरातून सर्वोत्तम 100 मॉडेल्सची निवड करण्यात आलेली होती. त्यातून पावसाळ्यात उद्भवलेल्या कोणत्याही पूरस्थितीमध्ये सहजगत्या "जीव वाचवणारा शर्ट" हे सोनेवाडी शाळेचे मॉडेल अव्वल ठरले. टाकावू वस्तूंचा वापर करून बनवलेले हे मॉडेल आता शाळा व तालुक्याबरोबरच जिल्ह्याचेही प्रतिनिधित्व करणार असल्याचे मुख्याध्यापक महेंद्र रहाणे यांनी सांगितले.
गटशिक्षणाधिकारी शबाना शेख , विस्तार अधिकारी श्रीमती पुजारी , केंद्रप्रमुख रावसाहेब लांडे , तालुका स्टार्स प्रकल्प मार्गदर्शक विवेक सोनवणे यांनी शाळेचे विशेष कौतुक केले. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने सोनेवाडी येथे जिल्हास्तरीय विजय साजरा करण्यात आला.यावेळी कुशाराम जावळे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण जावळे, उपाध्यक्ष सोमनाथ रायभान, मुख्याध्यापक महेंद्र रहाणे, पदवीधर शिक्षक मनोहर वहाडणे, सुरेश धनगर,विलास गवळी , चंद्रविलास गव्हाणे, बजरंग भागवत,अनिल पराड , श्रीम कविता पानसरे व श्रीम प्रिती जावळे , सर्व सदस्य, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक चंद्रविलास गव्हाणे यांनी केले तर आभार विलास गवळी यांनी मानले.






