बालहत्ये प्रकरणी अंधश्रद्धेच्या अंगाने चौकशी व्हावी: अंनिसचे कृष्णा चांदगुडे यांची मागणी
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथे शुक्रवारी गोदावरी नदीपात्रात पाच ते सहा वर्षाच्या मुलाचे शव आढळुन आले आहे.या प्रकरणात अंधश्रद्धेच्या अंगाने पोलीसांनी चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी पोलीस निरीक्षक संदिप कोळी यांच्याकडे केली आहे.
चासनळी हे धार्मिक तिर्थक्षेत्र आहे.आजही आमवशा- पौर्णिमेला अनेक भाविक दुरवरुन गोदावरीत स्थानाला येतात. भंगलेल्या मुर्त्या नदीत विसर्जित करण्यासाठीही दुरचे लोकही हे ठिकाण निवडतात. पंचक्रोशीतील दशक्रिया विधी व रक्षा विसर्जन येथे होते. त्यामुळे धार्मिक महत्व लाभल्याने तेथे चांगल्या सोबत वाईट बाबीही घडतात. दोन वर्षांपुर्वी एका जिवंत मनोरुग्ण मुलाचे हातपाय हातपाय बांधून त्याला गोदावरीत सोडण्याचा प्रकार घडला होता. चासनळी व मोर्विस येथील स्थानिक गावकऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून हा प्रकार उधळुन लावला होता. तो प्रकार अंधश्रद्धेतुन घडला असल्याचे चौकशीतुन नंतर स्पष्ट झाले होते.पुन्हा अशाच प्रकार घडला आहे का ,अशी शंका ग्रामस्तांनी उपस्थित केली आहे. सदर बालकाच्या कमरेला नविन करदोरा असल्याने शंकेला अधिक बळकटी मिळत आहे.सदरची हत्या ही नरबळी तर नसावी ना, अशा प्रश्न महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी उपस्थित केला आहे.तसेच चासनळी हे गाव नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने नाशिक पोलीसांची मदत घ्यावी व अंधश्रद्धेच्या दृष्टीने तपास व्हावा अशी मागणी त्यांनी पोलीसांकडे केली आहे.




