संजीवनी विद्यापीठाच्या विद्यार्थीनी धनश्री आणि स्वस्तिका ऑक्सफर्डमध्ये संशोधन सादर करणार- अमित कोल्हे
कोपरगाव समाचार :--संजीवनी विद्यापीठाच्या धनश्री सुनिल देवकर व स्वस्तिका कुलदीप जगताप या दोन विद्यार्थिनी ऑक्सफर्ड विद्यापीठातील जागतिक एआय परिषदेत आपले संशोधन सादर करणार आहेत. जगभरातील केवळ सोळा संशोधकांना ही संधी मिळाली. त्यात या सर्वात कमी वय असलेल्या दोघींचा समावेश आहे. या निमीत्ताने, संजीवनी विद्यापीठाची ‘रूरल टू ग्लोबल’ वाटचाल पुन्हा अधोरेखित झाली. अशी प्रतिक्रीया संजीवनी विद्यापिठाचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी व्यक्त केली.
श्री कोल्हे म्हणाले, या विद्यार्थिनींच्या ‘क्लॉड एआय लिटरसी’ या रिसर्च पेपरची युनायटेड किंग्डममधील ऑक्सफर्ड विद्यापीठात आयोजित ‘ग्लोबल एआय समिट २०२६’ या प्रतिष्ठित जागतिक परिषदेसाठी निवड झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील संशोधन व कौशल्य विकासाला चालना देण्यासाठी संजीवनी विद्यापीठाने ऑक्सफर्ड विद्यापीठातील तज्ज्ञांनी स्थापन केलेल्या ‘एर्डोस रिसर्च’ या संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या संस्थेचे संस्थापक व ऑक्सफर्ड विद्यापीठातील एआय तज्ज्ञ प्रा. अजित जावकर यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री देवकर व स्वस्तिका जगताप यांनी हा रिसर्च पेपर तयार केला
धनश्री व स्वस्तिका यांनी ‘क्लॉड एआय लिटरसी’ या रिसर्च पेपर मध्ये शिक्षक-विद्यार्थी संबंधित अध्यापन व अध्ययनाविषयी आपले संशोधन मांडले आहे. त्यांनी ते संजीवनी इंटरनॅशनल स्कूल (शिर्डी )व संजीवनी अकॅडमी (कोपरगांव) येथे प्रत्यक्ष प्रयोगातुन सिध्द केले. दोनही ठिकाणी शिक्षकांनी प्रथम एक धडा शिकविला आणि नंतर या दोघींनी क्लॉड एआय लिटरसी मधिल त्यांच्या पध्दतीनुसार शिकवीला. चाचणी नंतर क्लॉड एआय लिटरसी नुसार शिकविलेल्या पध्दतीत विध्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले. यावरून एआयच्य मदतीने शिकविणे हे अधिक कार्यक्षम आहे. हे या दोघींनी सिध्द केले.
संस्थेचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी या दोघींचे अभिनंदन केले. विद्यापीठाचे प्रसिडेंट अमित कोल्हे यांनी दोन मुली, त्यांचे पालक सुनिल देवकर, श्रध्दा देवकर, कुलदीप जगताप , अश्विनी जगताप यांचा सत्कार केला. व्हाईस चांसलर डाॅ. ए. जी. ठाकुर, डीन डाॅ. कविथा राणी, डाॅ. सरीता पवार, डाॅ. देवयानी भामरे उपस्थित होते.
ग्रामीण भागातील आमच्या मुलीला संजीवनी विद्यापीठाच्या जागतिक दर्जाच्या शिक्षण पद्धतीमुळे ऑक्सफर्ड विद्यापीठात संशोधन सादर करण्याची संधी मिळाली. ही केवळ आमच्या कुटुंबासाठी अभिमानाची बाब नसून संजीवनीच्या उत्कृष्ट शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञानाधारित अध्यापन आणि विद्यार्थी केंद्रीत दृष्टिकोनाची साक्ष आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक व्यासपीठावर पोहोचविण्याची ताकद संजीवनी विद्यापीठाने सिद्ध केली
- सुनिल देवकर (पालक)
आम्ही संवत्सरसारख्या ग्रामीण भागात राहतो. आमच्या मुलीच्या रिसर्च पेपरची ऑक्सफर्ड विद्यापीठाने निवड केली. संजीवनी विद्यापिठामूळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळाली
-अश्विनी जगताप (पालक)





