नाथांच्या नामघोषाने दुमदुमली संजीवनी; श्रावणात भक्ती-अध्यात्माचा जागर
कोपरगाव समाचार : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्रावण महिन्यानिमित्त प. पू. मोरेदादा प्रणित दिंडोरी दरबार स्वामी समर्थ केंद्राच्या मार्गदर्शनाखाली आयोजित नवनाथ पारायणाची भक्तिमय वातावरणात सांगता झाली. स्वामी समर्थ सेवेकरी संतोष जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी बोलताना संतोष जाधव म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी संघर्षातून कोपरगाव पंचक्रोशीसह परिसराच्या आर्थिक समृद्धीसाठी ‘संजीवनी’ नावाचे मोठे साम्राज्य उभे केले. या उद्योग समूहाचे मार्गदर्शक बिपीनदादा कोल्हे आणि कारखान्याचे युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी संस्थेच्या उत्कर्षात मोलाचे योगदान देत या कार्याला पुढे नेले आहे.कलियुगात प्रत्येकाच्या आयुष्यात विविध संकटे येत असतात. त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी अध्यात्मिक उपाययोजना सांगितल्या असून, त्यांचे आचरण करणे गरजेचे आहे. नवनाथ आणि गुरूचरित्र यांसारखे ग्रंथ प्रासादिक असून, त्यांचे पारायण प्रत्येक घरात झाले पाहिजे. जितकी अधिक पारायणे होतील, तितकी घराची आणि परिसराची आध्यात्मिक ऊर्जा वाढण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले.
आजची युवा पिढी भ्रमणध्वनीच्या अतिवापराच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी मोबाईलचा उपयोग आवश्यक कामांसाठीच करावा आणि त्याचा अतिरेक टाळावा, असे आवाहन केले. तसेच महिला भगिनींनी लहान मुलांना लहानपणापासून अध्यात्मिक संस्कारांची शिकवण द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
बाह्यबाधेचा दोष दूर करण्यासाठी नवनाथ सेवा अत्यंत पवित्र असून, प्रत्येकाच्या घरी स्वामी समर्थांची नित्य उपासना झाली पाहिजे, असे प्रतिपादन संतोष जाधव यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परजणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी कारखान्याचे संचालक ज्ञानदेव औताडे, विलासराव माळी, त्र्यंबकराव सरोदे, कामगार नेते मनोहर शिंदे, जनसंपर्क अधिकारी रंगनाथ लोंढे, कारवाडी स्वामी समर्थ सेवा केंद्राचे देवीदास जाधव, भगवान सैंदर यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कर्मचारी आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन सोळंके, चंद्रकांत जाधव आणि वसंत थोरात यांनी केले. शेवटी संचालक ज्ञानदेव औताडे यांनी आभार मानले.






