मोबाईलच्या युगात पोस्टकार्डवर उमटल्या विद्यार्थ्यांच्या भावना
नगरपालिका शाळा क्र. ५ मध्ये जागतिक पत्रलेखन दिनानिमित्त अनोखा उपक्रम
कोपरगाव समाचार :-- सध्याच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) आणि डिजिटल युगात विद्यार्थ्यांना हवी ती माहिती काही क्षणांत मोबाईलवर उपलब्ध होत आहे. वेळेची बचत आणि माहितीचा वेग हा याचा मोठा फायदा असला, तरी सततच्या डिजिटल अवलंबित्वामुळे विद्यार्थ्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि स्वतःच्या भावना शब्दांत व्यक्त करण्याची क्षमता नकळत कमी होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिका शाळा क्र. ५, बेट येथील शिक्षकांनी जागतिक पत्रलेखन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी पोस्टकार्डवर पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन केले.
डिजिटल संदेश, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या काळात हस्तलिखित पत्रलेखनाची हरवत चाललेली संस्कृती पुन्हा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, तसेच त्यांच्या लेखनकौशल्याला, कल्पनाशक्तीला आणि भावनिक अभिव्यक्तीला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.
स्पर्धेची घोषणा झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर ‘पत्र लिहायचे कोणाला?’ हा प्रश्न निर्माण झाला. मात्र शिक्षकांनी पारंपरिक पद्धतीने केवळ आई-वडील किंवा नातेवाईकांना पत्र लिहिण्याचा विषय न ठेवता विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे विविध पर्याय दिले.विद्यार्थ्यांना पाऊस, झाडे, पक्षी, प्राणी यांच्याशी संवाद साधत पत्र लिहिण्याची संधी देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या आवडीचे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनाही पत्र लिहिता येईल, असे सांगण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या उपक्रमाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली.स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांना पत्रलेखनाचे नियम समजावून सांगण्यात आले. कोणत्या व्यक्तीला किंवा विषयाला पत्र लिहिताना कोणते मुद्दे मांडावेत, पत्राचा आशय कसा असावा, सुरुवात व शेवट कसा करावा, याबाबत शिक्षकांनी मार्गदर्शन केले.
पोस्टातून आणलेली पोस्टकार्ड विद्यार्थ्यांना देण्यात आली. पोस्टकार्डच्या कोणत्या भागात पत्ता लिहायचा, कुठे पत्राचा मजकूर लिहायचा आणि पत्राची मांडणी कशी करायची, याचेही प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीला मुक्त वाव देत अतिशय सुंदर हस्ताक्षरात आणि मनापासून पत्रलेखन केले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना केवळ पत्रलेखनाचा अनुभव मिळाला नाही, तर विचार करणे, भावना व्यक्त करणे, कल्पना मांडणे आणि सुंदर अक्षरात लिहिणे या अनेक कौशल्यांचा सराव झाला.
मोबाईलच्या एका क्लिकवर संदेश पोहोचविण्याच्या काळात पोस्टकार्डवर पत्र लिहिण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी वेगळाच ठरला. कागदावर स्वतःच्या हाताने लिहिलेल्या शब्दांमधून भावना व्यक्त करण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी अनुभवला. त्यामुळे पत्रलेखन ही केवळ लेखनाची कला नसून विचार आणि भावनांना शब्दरूप देणारे प्रभावी माध्यम आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक विलास माळी, शिक्षक सुनील रहाणे व नसरीन पठाण यांनी विशेष मार्गदर्शन करून परिश्रम घेतले.
या अभिनव उपक्रमाचे कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी अजित निकत, शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी संजीवनी अंबिलवादे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य यांनी कौतुक केले.







