जिद्द, शिस्त आणि कौशल्याच्या बळावर यश मिळवा – सोमनाथ वाघचौरे
संजीवनी विद्यापीठात नवगतांचे स्वागत
कोपरगाव समाचार :-‘तुमची स्पर्धा केवळ तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी नाही तर जगभरातील विद्यार्थ्यांशी आहे. त्यामुळे शिस्त, कौशल्य आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या बळावर स्वतःला घडवा.चांगल्या करीअरचा संकल्प करा. करीअर असे करा की आपण तेथे सर्वाच्च असु. चांगले करीअर घडविण्यासाठी परीस्थिती कधीही आडवी येत नाही, मात्र जिध्द हवी’, असे प्रतिपादन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी केले.
संजीवनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नाॅलाजीच्या प्रथम वर्ष नवगतांच्या स्वागत समारंभासाठी आयोजित ‘संजीवनी संकल्प २के२६’ कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी युनिव्हर्सिटी प्रेसिडेंट अमित कोल्हे होते.
श्री वाघचौरे यांनी विध्यार्थ्यांना सांगितले की, शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्यासाठी नसून व्यक्तिमत्त्व घडविण्याचे माध्यम आहे. बाबा आमटे, विराट कोहली, एम. एफ. हुसेन, जॉर्ज बर्नार्ड शॉ आणि वॉरेन बफेट यांची उदाहरणे देत ते म्हणाले, आयुष्यात कोणतेही क्षेत्र निवडा, पण त्या क्षेत्रात सर्वोच्च स्थान मिळविण्याची जिद्द ठेवा. प्रत्येक विद्यार्थी बुद्धिमान असतोय मात्र त्या बुद्धिमत्तेला शिस्त आणि मेहनतीची जोड मिळाल्यास यश निश्चित मिळते. मी बैलगाडीतून प्रवास करणारा विद्यार्थी होतो, मात्र आज लाल दिव्याच्या गाडीत आलो. त्यामुळे स्वप्नांवर विश्वास ठेवून सातत्याने मेहनत केली, तर कोणतेही ध्येय गाठता येते.
सायबर सुरक्षेच्या विषयावर बोलताना श्री वाघचौरे यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करण्याचा सल्ला दिला. मोबाईल हे उपयुक्त साधन असले, तरी त्याच्या माध्यमातून अनेक सायबर गुन्हे आणि फसवणुकीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सतर्क राहून विवेकाने तंत्रज्ञानाचा वापर करावा. कोणत्याही व्यसनांच्या आहारी जाऊ नका आणि आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करा, असे ते म्हणाले.
यावेळी अमित कोल्हे यांनी एआयचा वापर करा पण त्यावर अवलंबून राहू नका. तंत्रज्ञान आपण नियंत्रित केले पाहिजे, तंत्रज्ञानाने आपल्याला नाही, असा सल्ला उपस्थित विध्यार्थ्यांना दिला. डिग्री तुम्हाला जॉब मिळविण्यासाठी पात्र बनवतेय पण स्किल्स तुम्हाला रोजगारक्षम बनवतात, तुमचा जॉब आणि तुमचं भविष्य सुरक्षित करतात. संजीवनीमध्ये इंडस्ट्री पॉवर्ड करिक्युलम, आंतरराष्ट्रीय इंटर्नशिप, परकीय भाषा प्रशिक्षण आणि करिअरकेंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना जागतिक संधींसाठी तयार केले जाते. या संधींचा पुरेपूर लाभ घ्या.
या प्रसंगी व्हाइस चान्सलर डॉ. ए. जी. ठाकूर, रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे, डीन डॉ. कविथा राणी, डॉ. प्रिया आर, डाॅ. विनोद मालकर, डॉ. सरिता पवार, डाॅ.मकरंद कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सूत्रसंचालन विद्यार्थिनी धनश्री देवकर आणि स्वस्तिका जगताप यांनी केले. आभार रजिस्ट्रार प्रा. अमोल ढाकणे यांनी मानले.






