नाटेगाव शाळेत वृक्षारोपण, परसबाग व रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम संपन्न
कोपरगाव समाचार : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नाटेगाव येथे पर्यावरण संवर्धन आणि जलसंधारणाचा संदेश देणारा वृक्षारोपण, परसबाग निर्मिती व रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सहाय्यक कृषी अधिकारी नवनाथ आघाव, कृषी संजीवनी शेतकरी गटाचे मेंटर संतोष गोसावी तसेच आत्माचे सहाय्यक अधिकारी राम निंबाळकर यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.कृषी संजीवनी शेतकरी गटाच्या सदस्यांनी श्रमदान करत वृक्षारोपण, परसबाग निर्मिती आणि रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे पूर्ण केली. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, पाणी बचत आणि निसर्गप्रेमाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद गुंजाळ, शिक्षकवृंद, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांनी वृक्षसंवर्धन, जलसंधारण आणि परसबागेचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले.
उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी कृषी संजीवनी शेतकरी गटाच्या सामाजिक व पर्यावरणपूरक कार्याचे कौतुक करत त्यांच्या योगदानाचे अभिनंदन केले.







