banner ads

संवत्सरच्या ज्ञानमंदिराला गुणवत्तेचा कळस

kopargaonsamachar
0

 संवत्सरच्या ज्ञानमंदिराला गुणवत्तेचा कळस जिल्हा परिषद शाळेचा राज्यभर आदर्श ठरणारा प्रवास


कोपरगाव समाचार:-ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा म्हणजे केवळ प्राथमिक शिक्षणाचे केंद्र, हा समज संवत्सर जिल्हा परिषद शाळेने पूर्णपणे खोटा ठरवला आहे. अत्याधुनिक भौतिक सुविधा, डिजिटल शिक्षण, पर्यावरणपूरक उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या उपक्रमांमुळे संवत्सरची जिल्हा परिषद शाळा आज राज्यातील आदर्श शाळांमध्ये गणली जात आहे. "संवत्सरच्या ज्ञानमंदिराला गुणवत्तेचा कळस" अशीच भावना प्रत्येक भेट देणाऱ्याच्या मनात निर्माण होते.




शाळेच्या भव्य प्रवेशद्वारापासून ते हिरवाईने नटलेल्या परिसरापर्यंत प्रत्येक ठिकाणी विद्यार्थीकेंद्रित नियोजन दिसून येते. संरक्षण भिंतींवरील शैक्षणिक चित्रे, आकर्षक शिल्प, स्वच्छ व प्रसन्न वातावरण आणि वृक्षसंपन्न परिसर शाळेची वेगळी ओळख निर्माण करतात.शाळेच्या आवारात भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या नावाने विकसित ओपन सायन्स पार्क, राशी उद्यान, बालवाटिका, सौरऊर्जा प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग, संगणक प्रयोगशाळा, विज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल वर्ग, इंटरॲक्टिव्ह बोर्ड, सुसज्ज ग्रंथालय, बहुउद्देशीय सभागृह, हँडवॉश स्टेशन, ओपन जिम आणि प्रशस्त क्रीडांगण अशा सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परिसरात सेंद्रिय शेती, भाजीपाला आणि फळबागांची लागवड करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीवही रुजवली जाते.विशेष म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक कार्यालयही पूर्णपणे डिजिटल स्वरूपाचे असून सीसीटीव्ही, साऊंड सिस्टीम आणि सर्व वर्गांशी थेट संपर्क साधण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सन १९०८ पासूनचा शाळेचा इतिहास डिजिटल स्वरूपात जतन करण्यात आला असून तो एका क्लिकवर उपलब्ध आहे.




विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या विकासासाठी पहिलीतील विद्यार्थ्यांकडून तीन अंकी संख्यांची बेरीज-वजाबाकी, तर दुसरीतील विद्यार्थ्यांकडून चार अंकी संख्यांवरील गणिती क्रिया सहजपणे करून घेतल्या जातात. पाचवीतील विद्यार्थ्यांना लॅपटॉपच्या साहाय्याने नियमित सराव दिला जातो. यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सातत्याने उंचावत आहे.गेल्या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवीच्या २१ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले, त्यापैकी एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत झळकला.


गेल्या पाच वर्षांत साठहून अधिक विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत नाव कोरले आहे. याशिवाय दर रविवारी सुट्टीच्या दिवशीही शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी शाळेत उपस्थित राहतात, ही बाब शाळेच्या समर्पित कार्यसंस्कृतीची साक्ष देते.'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या उपक्रमात सलग दोन वर्षे विभागस्तरीय पुरस्कार मिळवणाऱ्या या शाळेचे राज्यस्तरीय प्रथम क्रमांकासाठी मूल्यांकन झाले असून निकालाची उत्सुकता आहे. तसेच राज्यातील स्कफ उपक्रमात प्रथम दहा शाळांमध्ये स्थान मिळवून शाळेने आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

शिक्षण विभागाने राज्यातील केवळ ३६ शाळांची एज्युकेशन टूरसाठी निवड केली असून त्यामध्ये संवत्सर जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत मुख्याध्यापक फैयाजखान पठाण यांची शैक्षणिक अभ्यासदौऱ्यासाठी निवड होणे, ही शाळेसाठी मोठी गौरवाची बाब ठरली आहे.राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, डॉ. सुजय विखे पाटील, तसेच माजी जि.प. सदस्य राजेश परजणे पाटील , गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि शिक्षण विभागाचे सहकार्य यामुळे शाळेच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.

आज आधुनिक तंत्रज्ञान, डिजिटल शिक्षण, पर्यावरणपूरक उपक्रम आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण यांचा उत्कृष्ट मेळ घालत संवत्सर जिल्हा परिषद शाळा ही केवळ एक शाळा नसून ग्रामीण शिक्षणातील परिवर्तनाची प्रेरणादायी चळवळ बनली आहे. ज्ञान, गुणवत्ता आणि संस्कार यांचा संगम असलेले हे ज्ञानमंदिर राज्यातील इतर शाळांसाठी आदर्श ठरत असून, भविष्यातही यशाची नवी शिखरे सर करेल, असा विश्वास या शाळेचे मार्गदर्शक माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी व्यक्त केला





टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!