कोपरगावच्या सुरक्षेला अत्याधुनिक कवच
या वाहनामध्ये ३०० लिटर पाण्याची क्षमता व ५० लिटर फोम क्षमता असून विविध आपत्कालीन बचाव कार्यासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणांचा समावेश करण्यात आला आहे. वाहनात फर्स्ट एड बॉक्स, रिव्हर्सिबल टॉर्च, न्यूमॅटिक लिफ्टिंग बॅग, नायलॉन रोप, इमर्जन्सी सर्च लाईट, मल्टीपर्पज टूल किट, बॅटरी ऑपरेटेड वुड कटर, हायड्रॉलिक जॅक, रॅमर, चेन बोल्ट कटर, क्रोबार, बोर्ड कटर, रेस्क्यू हार्नेस आदी अत्याधुनिक साहित्य उपलब्ध आहे.क्विक रिस्पॉन्स फायर अँड रेस्क्यू वाहनाच्या मदतीने रस्ते अपघातांतील बचावकार्य, पावसाळ्यात रस्त्यावर पडलेली झाडे हटविणे, झाडांच्या फांद्या कापून वाहतूक सुरळीत करणे, अरुंद गल्लीबोळांतील आगीच्या घटनांमध्ये तातडीने पोहोचून आग विझविणे तसेच अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुरक्षित सुटका करणे शक्य होणार असून हे वाहन शहरासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यावेळी नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले की,महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून कोपरगाव नगरपरिषदेला अत्याधुनिक फायर अँड रेस्क्यू वाहन उपलब्ध झाले आहे. शहरात केमिकल, इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट तसेच अन्य कारणांमुळे आग लागण्याच्या घटना घडत असतात. अशा वेळी केवळ पाण्याने आग विझविणे शक्य होत नाही. त्यामुळे या वाहनामध्ये पाण्यासोबतच फोमची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे विविध प्रकारच्या आगींवर प्रभावीपणे नियंत्रण मिळविणे शक्य होणार आहे. तसेच रस्ते अपघातांमध्ये वाहनात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी कटर मशीनसह अन्य अत्याधुनिक रेस्क्यू उपकरणे उपलब्ध आहेत. वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्यासाठीही आवश्यक उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील अरुंद रस्ते व झोपडपट्टी भागात मोठी अग्निशमन वाहने पोहोचू शकत नसल्याने हे वाहन अशा ठिकाणी तातडीने पोहोचून प्रभावी बचावकार्य करेल. या वाहनामुळे शहरातील आपत्कालीन सेवा अधिक सक्षम होणार असून, ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे मी आभार व्यक्त करतो.
या अत्याधुनिक क्विक रिस्पॉन्स फायर अँड रेस्क्यू वाहनामुळे कोपरगाव शहरातील अग्निशमन व आपत्कालीन बचाव यंत्रणा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना अधिक जलद, परिणामकारक व आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नगरपरिषदेच्या प्रयत्नांमध्ये या वाहनाची महत्त्वपूर्ण भर पडणार आहे.
यावेळी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत,आरोग्य सभापती वैभव आढाव, विद्या सोनवणे, आकाश वाजे, प्रशांत कडू, संतोष शिंदे, अतुल काले, संजय उदावंत, विक्रमादित्य सातभाई, विनोद राक्षे, स्वप्निल मंजुळ, कैलास मंजुळ, दत्तूभाऊ पगारे, विजया देवकर, संदीप देवकर, फिरोज पठाण, सोनल अजमेरे, राजेंद्र सोनवणे, बबलू वाणी, नसीर मेंबर, गोपीनाथ गायकवाड, संतोष शेजवळ, सलीम पठाण, मयूर गायकवाड, रोहित वाघ, निसार शेख, बापू पवार, संतोष आढाव, देविदास रोठे, कलविंदर डडियाल, कैलास सोमासे, सचिन त्रिभुवन, सतीश रानोडे, मुकुंद उदावंत, चंद्रकांत वाघमारे, धनंजय आढाव,राकेश काले, किरण आव्हाड, ऋषिकेश गायकवाड, रवींद्र लचुरे, जयप्रकाश आव्हाड, सिद्धांत सोनवणे, लखन म्हस्के यांच्यासह, नगर परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






