banner ads

तुमच्या बापाला ताठ मानेने जगू द्या’;वसंत हंकारेंच्या शब्दांनी मुली ठसाठसा रडल्या

kopargaonsamachar
0

 तुमच्या बापाला ताठ मानेने जगू द्या’;वसंत हंकारेंच्या शब्दांनी मुली ठसाठसा रडल्या

कोपरगाव समाचार : "दोन तासांत उतरून जाणारे गुटखा, मावा किंवा दारूचे व्यसन माणसाला नामर्द बनवते. जर खरेच व्यसन करायचे असेल, तर ते कर्तृत्वाचे आणि अंगावर वर्दी आणण्याचे करा. तुमचा बाप ज्या रस्त्यावर फाटके कपडे घालून तुमच्या भविष्यासाठी राबला, त्याच रस्त्यावर त्याने अभिमानाने 'माझे पोर क्लास वन अधिकारी झाले' असे छातीठोकपणे सांगितले पाहिजे," असे परखड आणि प्रेरणादायी आवाहन प्रसिद्ध युवा प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी केले.




कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ग्रामपंचायत सदस्य राहुल (दादा) टेके पाटील यांच्या पाचव्या पुण्यस्मरणानिमित्त "न समजलेले आईबाप समजून घेताना" या विषयावर आयोजित व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सोमैय्या विद्यामंदिर व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, महिला आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे कामगार अधिकारी संजय कराळे होते. यावेळी माजी सभापती मच्छिंद्र टेके, मधुकर टेके, गोरख टेके, ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टेके, रामदास सोनवणे, बाबासाहेब शिंदे, नरेंद्र ललवाणी, प्राचार्य डॉ. सुनिता पारे, पर्यवेक्षक संजय गडकर, मुख्याध्यापक शरीफ शेख, कैलास शेळके, ह.भ.प. सुरेखा टेके महाराज, ह.भ.प. विनायक टेके महाराज, ह.भ.प. डॉ. सर्जेराव टेके महाराज, ह.भ.प. शंकर गोंडे महाराज, शिवव्याख्याते विजय नवले, सामाजिक कार्यकर्ते दिनेश निकम, वसंतराव गोरे, पत्रकार अरुण कदम आणि भागिनाथ गायकवाड यांची उपस्थिती होती.




आपल्या घणाघाती आणि हृदयस्पर्शी शैलीत बोलताना वसंत हंकारे यांनी आजच्या तरुण पिढीतील व्यसनाधीनता, मोबाईलचे वाढते आकर्षण आणि आई-वडिलांप्रती कमी होत चाललेली संवेदनशीलता यावर तीव्र भाष्य केले. "सोन्यासारखा बाप स्वतः उपाशी राहून, पोटाला चिमटा काढून मुलांच्या शिक्षणासाठी झटत असतो. मुलांनी शंभर रुपये मागितले तरी तो पाचशे रुपये हातावर ठेवतो. त्या बापाच्या कष्टाची जाणीव प्रत्येक मुलाने ठेवली पाहिजे," असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे देत उपस्थितांना अंतर्मुख केले.
मुलींना उद्देशून बोलताना त्यांनी भावनिक आवाहन केले की, "तुमचा बाप दिवस-रात्र तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटत असतो. क्षणिक आकर्षण आणि खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून स्वतःचे आणि आई-वडिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करू नका. तुमच्या आई-वडिलांना त्यांच्या हाताने तुमचे कन्यादान करण्याचे भाग्य मिळू द्या आणि त्यांना समाजात ताठ मानेने जगू द्या."
हंकारे यांच्या या हृदयस्पर्शी शब्दांनी उपस्थित विद्यार्थिनी विशेषतः भावूक झाल्या. अनेक मुलींच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला आणि सभागृहातील वातावरण काही काळ भारावून गेले. अनेक विद्यार्थी, पालक आणि युवकांनी यावेळी कोणत्याही प्रकारच्या व्यसनाला स्पर्श न करण्याचा तसेच केवळ शिक्षण, कर्तृत्व आणि आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केला.


"जोपर्यंत समाजातील एकही तरुण व्यसनमुक्त होत नाही, तोपर्यंत समाजाची खरी प्रगती होणार नाही. मोबाईलच्या आभासी दुनियेतून बाहेर पडून आई-वडिलांच्या डोळ्यांतील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करा," या संदेशाने वसंत हंकारे यांनी उपस्थितांच्या मनावर कायमचा ठसा उमटवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्जेराव टेके व विनायक टेके यांनी केले, तर गोरख टेके यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!