banner ads

१० कोटींचा रस्ता दोन वर्षांपासून रखडला उद्घाटन झाले पण काम कुठे?

kopargaonsamachar
0

 १० कोटींचा रस्ता दोन वर्षांपासून रखडला उद्घाटन झाले पण काम कुठे?

आ. काळेंकडून नागरिकांची दिशाभूल

कोपरगाव समाचार:-कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागाच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानल्या जाणाऱ्या कोळपेवाडी-सुरेगाव 10.01 कोटी रुपये निधीतून होणारे सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याचे काम मागील दोन वर्षांपासून पूर्णपणे बंद पडलेले असून,प्रत्यक्षात सुमारे 4.8 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.



विद्यमान लोकप्रतिनिधीकडून कामाबाबत मोठी दिशाभूल करण्यात आलेली असून रस्त्याचे काम पूर्ण न करताच मागील 20 महिन्यांपूर्वीच आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल्याचा आरोप स्व. शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे यांनी केला आहे.संचालक विलासराव वाबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत एस.एच.-07 ते कोळपेवाडी–सुरेगाव (कि.मी. 0/0 ते 4/800) या 4.8 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी सुरू करण्यात आले.10.01 कोटी रुपये खर्चाच्या या कामाचे नियोजन 8 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात काम रखडले असून जवळपास दोन वर्षांपासून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.संबंधित ठेकेदाराला काम वेळेत पूर्ण करण्याबाबत कोणत्याही प्रकारच्या प्रभावी सूचना देण्यात आल्या नसल्याने हे काम दीर्घकाळ रखडले आहे. या अपूर्ण रस्त्यामुळे दररोज प्रवास करणारे असंख्य वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून खड्ड्यांमुळे सातत्याने लहान-मोठे अपघात घडत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.





ते पुढे म्हणाले की, सन 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार आशुतोष काळे यांनी मतदारसंघात विविध विकासकामे करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही विकासकामे आजही कागदावरच असून प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांची कामे रखडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि वाहनचालकांना बसत असून दररोज खड्डेमय रस्त्यांवर अपघातांची मालिका सुरू आहे.


एकीकडे रस्त्याचे काम पूर्ण झाल्याप्रमाणे माहिती दर्शविणारे फलक झळकवले जात आहेत, तर दुसरीकडे प्रत्यक्षात रस्त्याचे कामच पूर्ण झालेले दिसत नाही. आमदार आशुतोष काळे यांच्या कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याचेच पूर्ण वाभाडे निघाले असून तो ठिकठिकाणी खड्ड्यांनी व्यापलेला आहे. स्वतःच्या गावाकडे जाणारा रस्ताच सुस्थितीत ठेवता येत नसेल, तर संपूर्ण मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था काय असेल, असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत.
यासंदर्भात वाबळे यांनी आरोप केला की, आमदार आशुतोष काळे यांनी विकासकामांच्या नावाखाली सर्वसामान्य मतदार व नागरिकांच्या डोळ्यांत धूळफेक केली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे. त्यामुळे केवळ उद्घाटने आणि फलकबाजी न करता रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

विशेष म्हणजे, प्रत्यक्षात रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसतानाही या ठिकाणी रस्त्याचा नमुना, काटछेद, कामाचा तपशील आणि काँक्रिटीकरणाच्या थरांची माहिती दर्शविणारे फलक लावण्यात आले आहेत. मात्र वस्तुस्थिती पाहता रस्त्याचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण झालेले नसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.कोळपेवाडी-सुरेगाव हा ग्रामीण भागातील अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून, या 4.8 किलोमीटर रस्त्याचे रखडलेले काम तातडीने पूर्ण करून गावठाण परिसरातील रस्ता काँक्रिटीकरणासह नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार आणि खड्डेमुक्त रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संचालक विलासराव वाबळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!