सुनील देवकर यांना ‘आरोग्य योद्धा पुरस्कार
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत मान्यवरांच्या हस्ते सन्मान
कोपरगाव समाचार : पुणे येथील द अमृत सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कोपरगाव तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक व जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये उल्लेखनीय योगदान देणारे माजी सभापती सुनील देवकर यांना प्रतिष्ठेचा ‘आरोग्य योद्धा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात हा सन्मान प्रदान करण्यात आला. तालुक्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्य, जनसंपर्क, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबतची संवेदनशीलता तसेच आरोग्य व समाजहिताच्या उपक्रमांमधील सक्रिय सहभाग याची दखल घेत द अमृत सोशल फाउंडेशन चे प्रतिनिधी शैलेश पोटे यांनी संपूर्ण तालुक्यात सर्वेक्षण करून सुनील देवकर यांची निवड केली.
या विशेष समारंभात राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी स्थानाचे मठाधिपती गुरुवर्य परमपूज्य रमेशगिरी महाराज तसेच कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्या हस्ते सुनील देवकर यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, योगप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुनील देवकर यांनी हा सन्मान कोपरगाव तालुक्यातील जनतेचा असल्याचे सांगत सामाजिक बांधिलकी जपत भविष्यातही संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, प्रथम महिला आमदार स्नेहलता कोल्हे, आमदार विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताची कामे अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सन्मानामुळे कोपरगाव तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याला नवी ओळख मिळाली असून, विविध स्तरांतून सुनील देवकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








