ajinky

banner ads

तणावमुक्त आणि निरोगी जीवनासाठी योग हीच गुरुकिल्ली” – ॲड. संदीप वर्पे

kopargaonsamachar
0

 तणावमुक्त आणि निरोगी जीवनासाठी योग हीच गुरुकिल्ली” – ॲड. संदीप वर्पे


कोपरगाव समाचार : “आजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक थकवा ही गंभीर समस्या बनली आहे. भूतकाळातील घटनांचे ओझे आणि भविष्यकाळातील चिंतांमुळे तणावाचे प्रमाण वाढत असून, त्यावर मात करण्यासाठी योग ही अत्यंत प्रभावी साधना असल्याचे प्रतिपादन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड. संदीप वर्पे यांनी केले.” रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC), आरोग्य विभाग आणि शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताचा पाच दिवसीय योग उत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे हे होते.




आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बोलताना ॲड. संदीप वर्पे म्हणाले की, “बदलती जीवनशैली, जंक फूडचे वाढते सेवन आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत योग आणि नियमित व्यायाम हे उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक आहेत. मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे युवकांवर होणाऱ्या परिणामांवरही योग प्रभावी उपाय ठरू शकतो. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात आयोजित पाच दिवसीय योग शिबिर उपयुक्त ठरत असून, पुढील वर्षी या उपक्रमाची व्याप्ती वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला जाईल”, असे त्यांनी सांगितले.




अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. सरोदे म्हणाले, “योग ही भारताच्या प्राचीन संस्कृतीची जगाला लाभलेली अमूल्य देणगी आहे. हजारो वर्षांपासून भारतीय जीवनपद्धतीचा अविभाज्य घटक असलेला योग हा केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल साधणारे व्यापक जीवनतत्त्वज्ञान आहे.योगामुळे शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधला जातो, तणाव कमी होतो, मन एकाग्र राहते. आज जगभर योगाचा स्वीकार होत असून, तो भारताच्या सांस्कृतिक वारशाचे जागतिक स्तरावरील प्रभावी प्रतीक बनला आहे.

आधुनिक जीवनशैलीमुळे वाढणारा ताणतणाव, मानसिक अस्थिरता आणि आरोग्याच्या विविध समस्या यांवर योग हा प्रभावी उपाय आहे. योगामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक एकाग्रता, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. योगाचे तत्त्वज्ञान केवळ आसनांपुरते मर्यादित नसून शिस्त, संयम, आत्मनियंत्रण आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा मार्ग दाखवणारे आहे. विद्यार्थ्यांनी दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करून निरोगी, सुदृढ आणि सक्षम समाजनिर्मितीस हातभार लावावा.”
या पाच दिवसीय योग उत्सवामध्ये विविध योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा तसेच योगाचे शास्त्रीय व व्यावहारिक महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.


सदर शिबिरासाठी योग प्रशिक्षक श्रीमती मुक्ता शेजवळ, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, डॉ. चंद्रभान चौधरी, डॉ. सीमा दाभाडे, डॉ. विशाल पवार, प्रा. सुनील कदम, कार्यालय अधीक्षक  सुनील गोसावी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads balaji adv banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!