कोपरगावच्या संत ज्ञानेश्वर स्कूलचा सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकाल
कोपरगाव समाचार:-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी ऑनलाईन जाहीर झाला. यामध्ये शहरातील संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्थेच्या 'संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल'ने यशाची उत्तुंग भरारी घेत सलग दहाव्या वर्षी १०० टक्के निकालाची देदीप्यमान परंपरा कायम राखली आहे. अतिशय उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या १० वर्षांत शाळेचा एकही विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेला नाही. हा कोपरगाव शहराच्या शैक्षणिक वर्तुळात एक अभिमानास्पद विक्रम मानला जात आहे.
यावर्षीच्या निकालात शाळेच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश संपादन करत पहिल्या तीनही क्रमांकांवर आपली निर्विवाद मोहोर उमटवली आहे. नारायणी नितीन शिंदे हिने ९४ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यापाठोपाठ आस्था किशोर देवडे हिने ८९ टक्के गुणांसह द्वितीय, तर साईश्री गणेश कानडे हिने ८८.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.या सर्व यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, उपाध्यक्ष किरण भोईर, विश्वस्त व पत्रकार राजेंद्र सालकर, कैलास जाधव, पोपट झुरळे, विशाल झावरे, ॲड. शंकर यादव,मुख्याध्यापक सचिन मोरे, उपमुख्याध्यापिका वैशाली लोखंडे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत.
शाळेच्या या सातत्यपूर्ण व दर्जेदार निकालामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा शाळेवरील विश्वास अधिकच दृढ झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, आगामी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी शाळेत प्रवेशासाठी गर्दी होत आहे. त्वरित प्रवेश निश्चित करून आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करण्याचे आवाहन शाळेतर्फे करण्यात आले आहे.
"गेल्या दशकापासून संत ज्ञानेश्वर स्कूलने शंभर टक्के निकालाची परंपरा केवळ टिकवलीच नाही, तर गुणवत्तेचा आलेखही सातत्याने उंचावला आहे. सलग दहा वर्षे दहावीच्या बोर्ड परीक्षेत एकही विद्यार्थी नापास न होऊ देणे, हे आमच्या शिक्षकांच्या अहोरात्र कष्टाचे, शालेय शिस्तीचे आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासू वृत्तीचे फळ आहे. तंत्रज्ञान आणि मूल्यांची सांगड घालत, भविष्यातही विद्यार्थ्यांना असेच दर्जेदार व आधुनिक शिक्षण देण्यासाठी आमची संस्था सदैव कटिबद्ध राहील."
-विशाल झावरे, कार्यकारी विश्वस्त, संत ज्ञानेश्वर विद्या प्रसारक संस्था, कोपरगाव.





