मनुष्याच्या जीवनांत आणि जेवणांत ठेचा असल्याशिवाय ते फुलत नाही-आचार्य शिरीष महाराज.
कोपरगांव समाचार :--मानवाला सुख केंव्हाही भोगता येतं पण दुःख पचविणे अवघड आहे, संसार सागरात फसलेले भगवंताला विसरले आहेत, जीवनाचे अंतिम सत्य काय आहे हे प्रत्येकाने ओळखले पाहिजे, लंकेचा राजा रावण होता पण लंका जळाली त्यावेळी त्याच्याजवळ कुणीही आलं नाही, अभिमन्यु चक्रव्यूह मध्ये फसले पण त्यांना कुणीही बाहेर काढले नाही तद्वत मनुष्याच्या जीवनांत आणि जेवणांत ठेचा असल्याशिवाय ते फुलत नाही, काडया करणा-याच्या नाडया वेळीच ओळखा, भक्ती केली की आपोआप मेवा मिळतो असे प्रतिपादन हरिद्वार येथील आचार्य प. पू. शिरीष महाराज यांनी केले
येथील मुंबादेवी तरूण मंडळाच्यावतीने ३२ वर्षापासुन रामनवमीनिमीत्त साईगांव पालखी सोहळ्याचे आयोजन केले जाते त्यानिमीत्त गुढीपाडव्यापासून संत ज्ञानेश्वर नगर, तहसिल कार्यालय मैदान कोपरगांव येथे नवनाथ भक्ती कथासारचे पहिले पुष्प गुंफतांना ते बोलत होते. प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प. पू. रमेशगिरी महाराज, आत्मा मालिक ध्यानपिठ (कोकमठाण) चे परमानंद महाराज व शहरातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक गुरूजन यांच्या हस्ते साईबाबा प्रतिमेचे पुजन करून आरती करण्यांत आली. मुंबादेवी मंडळाच्यावतींने लहान गटासाठी रामरक्षा तर मोठ्या गटासाठी हनुमान चालिसा पठणासह प्रश्नमंजुषा घेण्यांत आली त्यात ५ हजार ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यातील बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना २२ मार्च रोजी पारितोषकांचे वितरण केले जाणार आहे. सौ दिपाली जोशी यांना सोन्याची नथ भेट देण्यांत आली.
प. पू. रमेशगिरी महाराज याप्रसंगी बोलतांना म्हणांले की, गंगा गोदावरीनदीसह कोपरगांव शहर आणि तालुक्याचा परिसर ऐतिहासिक असुन असंख्य संत महंतांच्या पदस्पर्शाने ही भुमि पावन झालेली आहे. कथा श्रवण ही भक्ती असुन ती मानवाला अंतिम ध्येयापर्यंत घेवुन जाण्यांस नेहमीच मदत करते तेंव्हा प्रत्येकाने कथा श्रवण केलीच पाहिजे. प. पू. परमानंद महाराज म्हणाले की, मनुष्याच्या जीवनाची व्यथा दुर करण्यांत अध्यात्मीक कथेचा मोठा हातभार असतो. संपुर्ण विश्वात रामनवमीनिमीत्त कोपरगांवातुन शिर्डीसाठी निघणारी साईगांव पालखी सर्वांत मोठी आहे.
आचार्य प.पू. शिरीष महाराज पुढे म्हणाले की, माता पार्वतीला सर्वप्रथम देवांचा अधिदेव महादेवाने अमरकथा सांगितली त्यातील अंश १८ पुराणांत उतरले आहेत., म्हणुन प्रत्येकांने वेद पुराणांचा अभ्यास केला पाहिजे. कोपरगांव शहरासह तालुका पंचक्रोशीतील भाविकांचे भाग्य आहे याठिकाणी त्यांना नवनाथ भक्ती कथासार ऐकावयास मिळत आहे. जसं कर्म तसं फळ आहे. जीवनांत प्रत्येकांने गा-हाणे सांगण्याचे काम कमी करावे आत्मचिंतनासाठी भगवंत भक्ती सतत उपयोगी ठरते. जेथे हित चांगले होईल तेथे मनुष्याने बोलु नये. जो भक्ती करतो तेंव्हा भगवंत त्याच्या जवळ येत असतो. मनुष्य दुःखाचे जतन मनाच्या बँकेत सतत करत असतो. मृत्यु प्रत्येकाला अटळ आहे पण सुखाने जगता यायला पाहिजे. मानवाला सुख-दुःखामध्ये तडजोड करावी लागते. नवनाथ कथेतील मच्छिंद्रनाथांचा जन्म कसा झाला याबाबत आचार्य शिरीष महाराज यांनी सविस्तर विवेचन केले.
बीड येथील लोककलावंत, दूरचित्रवाणी स्टार शुभम बो-हाडे याने सुर निरागस हो, भोले शंकर या गाण्यावर बहारदार नृत्य सादर करत उपस्थित भाविकांची मने जिंकली. टाळयांच्या कडकडाटात त्यास दाद देण्यांत आली




