banner ads

पतसंस्थेच्या नावाखाली लाखोंची लूट; कोपरगावात आरोपी अटकेत

kopargaonsamachar
0

 

पतसंस्थेच्या नावाखाली लाखोंची लूट; कोपरगावात आरोपी अटकेत


कोपरगाव समाचार --: जास्त व्याजदराचे आमिष दाखवत पतसंस्थेच्या नावाखाली शेतकरी व व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा गंडा घालणारे फसवणुकीचे जाळे कोपरगावमध्ये उघडकीस आले आहे. एका शेतकऱ्याची तब्बल १३ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला असून अशाच पद्धतीने अनेकांना लाखो रुपयांनी लुबाडल्याची चर्चा परिसरात सुरू झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.




याप्रकरणी शेतकरी सुखदेव लीलाबा लासुरे (वय ६७, रा. नवले वस्ती, खिर्डी गणेश, यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रविण शंकर वरगुडे (रा. सवंत्सर, ता. कोपरगाव) व विजय प्रभाकर खोडगे (रा. नाशिक) यांच्या विरोधात विविध कलमान्वये १३ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आरोपींचा शोध सुरू असताना अखेर पोलिसांनी प्रविण वरगुडे याला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरगुडे याने ‘साई बालाजी तालुका नागरी सहकारी पतसंस्था’ या नावाने जास्त व्याज मिळवून देण्याचे आमिष दाखवत फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मुदतठेवीच्या नावाखाली वेगवेगळ्या वेळी एकूण १३ लाख ५ हजार रुपये घेतले. पुढे त्याने विजय खोडगे याची शेअर मार्केट सल्लागार म्हणून ओळख करून देत शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल असे सांगितले. या आमिषाला बळी पडून फिर्यादीच्या मुलाकडून आणखी ७ लाख ५० हजार रुपये गुंतवणुकीसाठी देण्यात आले.




मात्र काही कालावधीनंतर पैसे परत मागितल्यावर संबंधित पतसंस्था बंद असल्याचे समोर आले. आरोपींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते टाळाटाळ करत संपर्काबाहेर गेले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल केली.
दरम्यान, संबंधित पतसंस्थेच्या नावाखाली अनेक नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप होत असून आणखी पीडित पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करून फसवणुकीचे रॅकेट उघड करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे करीत आहेत.
दरम्यान, आरोपी प्रविण वरगुडे याला अटक करून कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. न्यायमूर्ती माननीय केळकर यांच्या समोर या प्रकरणाची सुनावणी झाली असून फिर्यादी पक्षाच्या वतीने अॅड. अनुप ठोळे यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!