सत्याग्रह करताना संयम आणि प्रामाणिकपणा महत्त्वाचा
कोपरगाव समाचार --: सध्याची सर्वच परिस्थिती विचित्र आहे. समाजकारण आणि राजकारण या दोन्ही ठिकाणी स्वार्थी आणि नाठाळांचे बहुमत आहे. अशा परिस्थितीत निरपेक्षपणे काम करणारी सत्याग्रही सारखी सेवाभावी संघटना लवकरच जिल्ह्या-जिल्ह्यातून राज्य पातळीवर पोहचेल असा विश्वास "स्नेहालय" या संस्थेचे अध्यक्ष व जेष्ठ समाजसेवक प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
निस्वार्थी समाजसेवक रामदासअण्णा खैरे यांनी स्थापन केलेल्या “सत्याग्रही” या संस्थेचा शुभारंभ रविवारी दि. 29 मार्च रोजी कोपरगावच्या नामदेव परजने पा. लॉ कॉलेजच्या पटांगणात झाला. त्यावेळी डॉ. गिरीश कुलकर्णी बोलत होते. "सत्याग्रही" संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास खैरे अध्यक्षस्थानी होते. सत्याचा आग्रह धरताना सत्तेला विरोध करावा लागतो. अन्याय अत्याचाराची चाड अनेकांना असते. अन्याय अत्याचारा विरोधात फक्त बोलून चीड व्यक्त करणारे मात्र प्रत्यक्ष सत्याग्रह करताना कच खातात. आपले सुखी आणि आरामी जीवन सोडून सत्याचा आग्रह धरणारे व त्यासाठी प्रसंगी सत्याग्रह करणारे खरे देशभक्त आहेत. असे गौरवोदगार डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी काढले. सत्याग्रही संघटनेने हाती घेतलेल्या सर्व उपक्रमांना, आंदोलनाला सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी यावेळी दिले. एकल महिलांसाठी विशेष कार्य केल्याबद्दल शासनाचा पुरस्कार मिळालेल्या सावित्रीबाई फुले ज्ञानपीठ प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. संगीता मालकर यांचा डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी उद्योजक अरविंद भनसाळी, ज्येष्ठ नेते राजेंद्र जाधव, संदीप वर्पे, बबलु वाणी, माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे, ज्येष्ठ नागरिक सेवा मंचाचे अध्यक्ष विजय बंब, डॉ. रमेश कोठारी, डॉ. विलास आचारी, योगतज्ञ उत्तमभाई शहा, योगतज्ञ दत्ता पुंडे, श्रीकांत बागुल, दीपक साळुंके, ॲड. जयंत जोशी यांचे सह नामदेवराव परजणे पाटील लॉ कॉलेज, श्री चक्रधर स्वामी डीएड कॉलेज व श्री चक्रधर स्वामी आयटीआय कॉलेज व केशरबाई महानुभाव नर्सिंग स्कूलचे प्राचार्य, प्राध्यापक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
पी एम पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर दिलीप सोनवणे यांनी आभार मानले.




