वडिलांच्या 'वर्षश्राद्ध' च्या दिवशी लेकीकडून' बापाला' अनोखी श्रद्धांजली
कोपरगाव समाचार :--कुटुंबाचा मुख्य आधार बाप असतो. बाप कधी व्यक्त होत नाही. बाप कधी रडत नाही म्हणून बापाला वेदनाच नसतात असाच सर्वांचा समज झालेला आपण पाहतो. आईवर आजपर्यंत खूप लिखाण झाले. त्यातून आई घराघरात पोहोचली. तिचा त्याग, समर्पण , वेदना प्रत्येकाला आपल्या वाटायला लागल्या. यातच बाप कुठेतरी दुर्लक्षित राहिला. बाप शिस्त लावणारा म्हणून तो कठोर वाटतो पण बापालाही एक हळवं मन असतं, तोही त्याग-समर्पण करतो, त्यालाही भावना असतात हे समाजासमोर आणण्याचा प्रयत्न जि.प.प्राथ.शाळा कुंभारी ता.कोपरगाव जि.अहिल्यानगर येथील शिक्षिका श्रीम.विजया विठ्ठल जाधव यांनी 'बाप' या काव्यसंग्रहातून करून आपल्या वडिलांना वर्षश्राद्धच्या निमित्ताने आगळीवेगळी आदरांजली अर्पण केली आहे.
'वर्षश्राद्ध ' च्या पवित्र दिवशी मानोरी ता.राहुरी येथील कै.विठ्ठल बाबुराव जाधव यांच्या परिसरात श्रीम.विजया विठ्ठल जाधव लिखित ' बाप' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्धव महाराज मंडलिक, माजी खासदार प्रसाद तनपुरे, संभूगिरी महाराज गोसावी, लक्ष्मण महाराज चौगुले, श्री. निमसे सर, कराड सर, कोहकडे सर, ठाकरे सर, गुंजाळ सर, रामदास जाधव, पवार बाई, सुमन जाधव यांच्या हस्ते अत्यंत श्रद्धामय व भावनिक वातावरणात करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवर्ग,सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काव्यसंग्रहाविषयी बोलताना मान्यवरांनी सांगितले की आईसारखेच बापाचेही कर्तृत्व, वेदना ,भावना समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. बाप या विषयावर साहित्यनिर्मिती होणे सामाजिक गरज आहे. या काव्यसंग्रहातील कविता प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणार्या तसेच बापाच्या जीवनातील विविध अनुभवांची मांडणी करणार्या आहेत.या कविता वाचकांना भावनिक करून अंतर्मुख करणार्या तसेच बापाच्या भूमिकेचे वास्तव समाजासमोर आणणार्या आहेत.
हा काव्यसंग्रह साहित्यक्षेत्रात नक्कीच वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. उपस्थितीतांनी विजया जाधव यांच्या साहित्यिक योगदानाचे कौतुक करत त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
आपल्या लेकीचे हे कार्य कै.विठ्ठल बाबुराव जाधव हे नक्कीच अभिमानाने बघत असतील यात तिळमात्र शंका नाही. एका लेकीकडून बापाला यापेक्षा मोठी आदरांजली ती कोणती असेल?? कवयित्री व शिक्षिका विजया जाधव -माळी यांचे कोपरगाव तालुका गटशिक्षणाधिकारी शबाना शेख, सर्व विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांनी अभिनंदन व कौतुक केले.





