पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार - आ.आशुतोष काळे
बाबा पीर रतन नाथ मंदिर तोडफोड कोपरगावात पंजाबी हिंदू व शीख बांधवांकडून निषेध मोर्चा
कोपरगाव समाचार:-
कोपरगावात शीख समाजाच्या वतीने दिल्ली येथे महानगरपालिकेने झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतन नाथ मंदिरांची तोडफोड केली. त्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात आ.आशुतोष काळे यांनी सहभागी होवून दिल्ली महानगरपालिकेच्या अन्यायकारक कृत्याचा निषेध करून शीख समाजाच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली.
शीख समाजाच्या वतीने दिल्ली येथे महानगरपालिकेकडून झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतन नाथ मंदिरांची तोडफोड करण्यात आली आहे. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी कोपरगाव शहरातील पंजाबी हिंदू व शीख बांधवांनी एकत्र येवून प्रभू श्री रामांचे दर्शन घेऊन श्रीराम मंदिर ते तहसील कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला. कोपरगावच्या नायब तहसीलदार श्रीम.प्रफुल्लीता सातपुते यांना निवेदन देवून धार्मिक स्थळ तोडफोड विरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. यावेळी आ.आशुतोष काळे यांच्यासमवेत राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शांततेच्या मार्गाने काढण्यात आलेल्या या निषेध मोर्चात आ.आशुतोष काळे यांनी सहभागी होवून पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना जाणून घेतल्या. दिल्ली येथे महानगरपालिकेने झंडेवालान परिसरातील बाबा पीर रतन नाथ मंदिरांची केलेली तोडफोड अतिशय दुर्दैवी घटना आहे.त्यामुळे निश्चितपणे पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबाबत दिल्लीच्या मुख्यमंत्री ना.रेखा गुप्ताजी, तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजीतदादा पवार यांना लेखी पत्र पाठवून त्या पत्रात पंजाबी हिंदू व शीख बांधवांच्या भावना दुखावल्या असल्याचे नमूद करून त्यांच्या भावनांचा आदर करून दिल्लीच्या त्या जमिनीबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे. मी तुमच्या सोबत असून मी लोकप्रतिनिधी या नात्याने आपल्या सर्वांच्या भावना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवणार आहे. आपल्याला माझी कधीही गरज भासल्यास मी सदैव आपल्या सोबत आहे. तुम्हाला जिथे माझी गरज भासेल तिथे मी स्वतः तुम्हा सर्वांसोबत ठामपणे उभा राहीन अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी पंजाबी हिंदू व शीख बांधवांना दिली.




