आमच्या उमेदवारांवरही हल्ला होऊ शकतो त्यामुळे आम्हाला संरक्षण द्या -- काका कोयटे
कोपरगाव समाचार :-समता पतसंस्थेबाबत सोशल मिडीयाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरविण्यात आली असून चुकीची माहिती पसरविणाऱ्या व्यक्तींचे फोन नंबर पोलीस प्रशासनाला चार दिवसांपूर्वी दिले आहेत परंतु त्याबाबत आजपर्यंत पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. सोमवार (दि.१५) रोजी तर समताच्या कर्मचाऱ्यावरच हल्ला करण्यात आला आहे. या दोन्ही घटनेतील आरोपींवर तातडीने अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे एपीआय ज्ञानेश्वर सोनवणे यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे म्हणाले की, समताच्या कर्मचाऱ्यावर सकाळी हल्ला झाला परंतु संध्याकाळ पर्यंत पोलीस प्रशासनाने एफआरआय दाखल केलेली नव्हती.आम्ही दिलेल्या तक्रार अर्जावर पोलीस प्रशासनाने कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. सोशल मिडियावर बदनामी करणाऱ्या व्यक्तीला प्राथमिक स्तरावर पोलीस स्टेशनला बोलून साधी चौकशी देखील करण्यात आलेली नाही. पोलीस प्रशासनाने अशा प्रवृत्तीच्या लोकांवर तातडीने कारवाई करावी. आज समताच्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाला उद्या आमच्या उमेदवारांवरही हल्ला होऊ शकतो त्यामुळे आम्हाला संरक्षण द्या अन्यथा लोकशाहीच्या मार्गाने आम्हाला सत्याग्रह करावा लागेल.
जेव्हापासून आ.आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदासाठी माझी उमेदवारी जाहीर केली तेव्हापासून विरोधकांना त्यांचा पराभव होणार असल्याचे कळून चुकले आहे. म्हणून निवडणुकीत दहशतीचा वापर करून खोड्या करण्याचे काम विरोधक करीत आहे. विरोधक जेवढे बिनबुडाचे व निराधार आरोप आमच्यावर करतील आणि आमच्या विरोधात षड्यंत्र रचतील तेवढे जास्त मताधिक्य आम्हाला मिळणार आहे. सर्व सामान्यांचा आमच्यावरचा विश्वास वाढला आहे, म्हणून आम्ही भरघोस मताधिक्याने निवडून येणार आहे.पोलिसांनी मात्र त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. कारण आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव मतदार संघासह शहरातील अवैध व्यवसायाबाबत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा अर्थंमंत्री ना.अजितदादा पवार यांना निवेदन दिलेले आहे. परंतु पोलीस प्रशासनाने अजूनही अवैध धंद्याबाबत कोणतीही कारवाई केलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा वेगळ्या चर्चा घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने आमच्या निवेदनाची दखल घेवून समताच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्या व समता पतसंस्थेची बदनामी करणाऱ्या आरोपींना तातडीने जेरबंद करावे अशी मागणी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ओमप्रकाश तथा काका कोयटे यांनी केली.




