शहराला बळजबरीने लादलेल्या काका आणि साहेब यांच्या सारखे पंचतारंकित लोकं नकोय.-- विमल पुंडे
कोपरगाव समाचार:-आपल्याला आपल्या हक्कासाठी साथ देणाऱ्या राजेंद्र झावरे या स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला निवडून द्यायचे आहे. शहरावर बळजबरीने लादलेल्या काका आणि साहेब यांच्या सारखे पंचतारंकित लोकं नकोय. राजेंद्र झावरे यांनी त्यांच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामाचे आपण सर्व साक्षीदार आहोत.त्यामुळे पुन्हा एकदा 2001 ची पुनरावृत्ती करायची असल्याचे प्रतिपादन महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी व्यक्त केले आहे.शहरातील गजानन नगर येथे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे व प्रभाग क्रमांक 14 चे शिवसेनेचे उमेदवार शंकर गंगुले, राठोड परीगाबाई, वैभव चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित कॉर्नर सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हाप्रमुख नितीन औताडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे, किरण खर्डे, दिलीप सोनवणे, ॲड.श्रीनिवास डागा, इरफान शेख आदी सह मोठ्या प्रमाणावर प्रभागातील नागरिक उपस्थित होते.राहुल देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंगला पवार या होत्या.
यावेळी बोलताना विमल पुंडे म्हणाल्या की, राजेंद्र झावरे यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात राज्यात सत्ता नव्हती, तरी भाऊंनी शहराच्या विकासात भर टाकण्यासाठी संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज नेहरू भाजी मंडई आदींसह शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधले तर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे आदि महापुरुषांची पुतळ्यांची उभारणी केली आहे. त्यामुळे त्यांना कोपरगावकर विकास पुरुष म्हणतात. त्यामुळे २००१ सारखी नगराध्यक्षपदाची संधी आपण राजाभाऊ झावरे यांना द्यावी.तसेच लाडकी बहीण' योजना फक्त आणि फक्त माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरु केली आहे.मुलींचे शिक्षण, एस.टी.चे अर्धे तिकीट यासारख्या योजना तसेच शिंदे साहेब आपल्याला 'लाडकी बहीण' चे मानधन २१०० रुपये करणार आहेत. शिंदे साहेब हे रिक्षा चालक होते आणि आता राजेंद्र झावरे हे देखील रिक्षा चालक आहेत. सामान्य माणूस म्हणून आपल्याला विकासासाठी त्यांना निवडून द्यायचे आहे असे मत महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमल पुंडे यांनी व्यक्त केले
नितीन औताडे म्हणाले की, गेल्या ५० वर्षात तालुक्याची व पालिकेची सत्ता काळे-कोल्हे कुटुंबात राहिली. या नेत्यांचे बगलबच्चे नगराध्यक्ष म्हणून सातत्याने राहिले. इतके वर्ष सत्ता असून हे दोन्ही नेते शहर विकासाचे व्हीजन लोकांपुढे मांडत आहेत, हीच मोठी शोकांतिका आहे. निवडणूक आल्या की नागरिकांना भूलथापा देवून सत्ता ताब्यात घ्यायची, या व्यतिरिक्त त्यांनी काही केलेले नाही. सत्ता असताना तुम्ही विकास का केला नाही, हे नागरिकांनी विचारावा तसेच मतदार संघात ४००० कोटींचा विकास झाल्याच्या वल्गना केल्या जातात. असे असते तर मतदार संघात एकही प्रश्न शिल्लक नसता. पाच वर्षापासून १३१ कोटीच्या पाणी योजनेच्या साठवण तलावाच्या भोवती राजकारण फिरते आहे. ३००० कोटीचे अयोध्या राममंदिर, ५५ हजार कोटींचा समृद्धी महामार्ग पाच वर्षाच्या आत पूर्णत्वास गेले. मात्र शहर पाणी योजना पूर्णत्वास जाऊ शकली नाही. ५० वर्षात राजकारण करत एकमेकांची जिरवाजिरवी करत दोघांनी तालुका भकास केला. शहरात बदल करावयाचा असेल तर यांना हटवाचे लागेल, विरोधकांचे उमेदवार म्हणजे बुजगावणे आहे. त्यांना दादा, भैय्या यांची परवानगी घ्यावी लागेल. मात्र राजेंद्र झावरे हे शिंदे शिवसेनेचे असून सर्व सामन्यांच्या प्रश्नावर जागेवर निर्णय घेणारा सक्षम उमेदवार आहे. कोणाला निवडून द्यायचे याचा विचार कोपरगावकरांनी करावा असेही शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन औताडे म्हणाले.नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र झावरे म्हणाले की,कोपरगावात कितीही तळे झाले तरी जो पर्यंत पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करत नाही तो पर्यंत एक दिवस आड शुद्ध पाणी देणे शक्य नाही. मी नगराध्यक्ष असतांना योग्य नियोजन केले त्यामुळे २००१ ते २००६ पर्यंत एक दिवस आड शुद्ध पाणी देऊ शकलो.कोपरगाव शहराचा विकास करणे हे आपले कर्तव्य समजून शहरात अनेक शॉपिंग कॉम्प्लेक्स महापुरुषांची पुतळे गटार संत मौनगिरी महाराज सेतू यासह मोठ्या प्रमाणावर अनेक विकासकामे करून शहराच्या सौंदर्यात भर टाकली. पुन्हा शिंदे शिवसेनेच्या उमेदवारांना संधी दिली आहे. नागरिकांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास टाकून मी पहिल्यापेक्षा जास्त शहराचा विकास करून दाखवेल असा आत्मविश्वास झावरे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.




