फार्मसी शिक्षणाने दर्जेदार संधी उपलब्ध -- भोसले
कोपरगाव समाचार / लक्ष्मण वावरे
फार्मसी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर करिअरसाठी अनेक दर्जेदार संधी उपलब्ध होत आहेत. विशेषतः उद्योग, उत्पादन, गुणवत्ता नियंत्रण, मार्केटिंग, हॉस्पिटल फार्मसी, क्लिनिकल फार्मसी आणि संशोधन आदी क्षेत्रांत उत्तम व्यावसायिक संधी निर्माण होत असून विद्यार्थ्यांनी आपल्या करिअरला योग्य दिशा द्यावी. तसेच विद्यार्थ्यांनी कौशल्यविकासावर भर देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक होण्याचे आवाहन अरुण बी. भोसले, संस्थापक व संचालक – बायोफॅक्ट इंडिया एंटरप्रायझेस व बायोकॅटलिस्ट इंडिया प्रा. लि. यांनी केले.
कोकमठाण येथील राष्ट्रसंत जानार्दन स्वामी कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित इंडक्शन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमात प्रथम वर्ष डी.फार्म, बी.फार्म आणि एम.फार्म अभ्यासक्रमातील नवोदित विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान विविध प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक नियम, अभ्यासक्रम रचना, परीक्षा पद्धती, उपस्थितीचे महत्त्व आणि व्यावसायिक आचारसंहिता याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच ग्रंथालयाचे नियम, पुस्तक कर्ज सुविधा, डिजिटल साधने आणि आत्मअभ्यासाचे महत्त्वही विद्यार्थ्यांना समजावण्यात आले. फार्मसी क्षेत्रातील जीपीएटी, नायपर, यूपीएससी आणि राज्य लोकसेवा आयोग यांसारख्या स्पर्धा परीक्षांविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचा परिचय करून देणे, फार्मसी क्षेत्रातील संधी स्पष्ट करणे व त्यांच्यात प्रेरणा निर्माण करणे या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण बी. भोसले, कडू सर (मुख्य कार्यकारी अधिकारी – श्रीराम इंडस्ट्री), तसेच. अनिकेत ए. भोसले (गुणवत्ता नियंत्रण व्यवस्थापक – बायोफॅक्ट इंडिया एंटरप्रायझेस व बायोकॅटलिस्ट इंडिया प्रा. लि.) उपस्थित होते. यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. नितीन जैन आणि उपप्राचार्या डॉ. उषा जैन यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
द्वितीय वर्ष बी.फार्मसीच्या विद्यार्थिनी कु. वैष्णवी रावते व कु. क्षितिजा जमदडे यांनी सूत्रसंचालन केले, तर द्वितीय वर्ष एम.फार्मसीची विद्यार्थिनी कु. ऋतुजा मेहेत्रे हिने आपले वकृत्व सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. सचिन आगलावे, करवीर आघाडे, लसुरे उत्कर्षा, चौधरी कावेरी, सिंग अमृता, भाटी वर्षा, कांचन गुरसळ, पूजा जाधव आणि वैष्णवी लोखंडे आदींनी नियोजनपूर्वक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.






