काळे यांच्या प्रतिक्रियेमुळे साईभक्तांमध्ये चर्चेला उधाण
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
अलीकडे मध्यप्रदेशात प्रदीप मिश्रांना एका पत्रकाराने “श्री साईबाबा देव आहेत का?” असा प्रश्न विचारला असता, त्यांनी त्याला सकारात्मक उत्तर दिले नव्हते. यावर प्रतिक्रिया देताना संजय काळे म्हणाले,
“महाराष्ट्र ही साधू–संतांची भूमी आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज यांसह असंख्य संतांची परंपरा आहे. महाराष्ट्रातील सर्व संत एकमेकांचा आदर करतात.
श्री साईबाबा आमचे श्रद्धास्थान आहेत, आणि जगभरातील कोट्यवधी साईभक्त त्यांना देव मानतात.”
“मी स्वतः साईभक्त आहे. मागील २५ वर्षांपासून दर गुरुवारी १५ किलोमीटर पायी चालत साईंचे दर्शन घेतो. मी दहा वेळा केदारनाथ धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि लवकरच चारधाम पूर्ण करणार आहे.
पण प्रदीप मिश्रांसारखे महागडे कथाकार शिर्डीला येऊन साईंचे दर्शन घेत नाहीत, हे हिंदू धर्म शिकवत नाही.”
“साईबाबा स्वतःला देव समजत नसले तरी कोट्यवधी भक्तांना त्यांच्या दर्शनाने अनुभूती मिळते. म्हणूनच भक्तांचा ओघ वाढतच आहे. प्रदीप मिश्रा मोठे वक्ते असतील, पण हिंदू धर्माने दिलेली सहिष्णुता आणि भक्तिभावाची शिकवण त्यांच्याकडे नाही.”
“कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, राहुरी भागातील लोकांचे उदरनिर्वाह श्री साईबाबांच्या कृपेने चालतात. राज्यातील सर्व पक्षांचे मंत्री, अधिकारी, व्यापारी, उद्योजक नियमित साईचरणी नतमस्तक होतात. मग कोण आहेत हे प्रदीप मिश्रा, जे शिर्डीच्या भूमीत येऊन द्वेष पसरवतात?” असा सवालही काळे यांनी उपस्थित केला.
“माझा महाराष्ट्र कोणत्याही साधू-संतांविरुद्ध छूत-अछूतभाव सहन करणार नाही. प्रदीप मिश्रा देव नाहीत, पण आमचे श्री साईबाबा आमच्यासाठी देव आहेत. धर्म शिकायचा असेल तर तो घराघरात सोमवारी अभिषेक करणाऱ्या आणि शिवलिलामृत वाचणाऱ्या मातांकडून शिकावा, धर्माचा बाजार मांडणाऱ्यांकडून नव्हे,” असे ते म्हणाले.
काळे यांच्या या परखड प्रतिक्रियेमुळे साईभक्तांमध्ये चर्चेला उधाण आले आहे







