मुर्शतपूरमध्ये जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची विद्यार्थ्यास अमानुष मारहाण
पालक वर्गात संतापाची लाट
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्र हादरले आहे. ८ सप्टेंबर रोजी इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यास शाळेतील शिक्षकाने पाठीवर वळ उमटेल इतपत मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संबंधित शिक्षक यांनी शाळेत दोन दिवस अनुपस्थित राहिल्याच्या कारणावरून विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याने. या घटनेनंतर विद्यार्थ्याच्या पालकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली असून, अशा शिक्षकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी पालकवर्गातून जोर धरू लागली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सदर प्रकरण स्थानिक काही राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि अखेर ते गुपचूप मिटवण्यात आले. मात्र प्रश्न असा उभा राहतो की — गरीब घरातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मारहाण करून त्यांच्या मनात भीती निर्माण करायची आणि त्यांना शिक्षणापासून दूर ठेवायचं ही कोणती शिक्षणसंस्कृती?
आधीच जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत असताना अशा प्रकारच्या घटना घडल्याने गरिब पालकांमध्ये तीव्र चिंता पसरली आहे. “आपल्या मुलाला शाळेत पाठवावे की नाही?” असा प्रश्न अनेक पालकांच्या मनात निर्माण झाला आहे.
गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणापासून परावृत्त करणारी ही प्रवृत्ती अतिशय विद्रूप आणि चिंताजनक असल्याचे सर्वसामान्य पालकवर्गाचे मत आहे.
या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी करून संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करावी, अशी सर्वत्र मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणात गटशिक्षणाधिकारी कोणती भूमिका बजावतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







शिक्षक हा जीवन घडवतो तो कधीच मुलाचे वाईट होऊन नाही देत असा प्रकार झाला अशेल पण त्यातून वाटीत काहीच नाही आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे ही त्याची कळकळीची इच्छा अशेल अशे का विचार करत नाही तरी पूर्वी सारखे शिक्षक राहिले नाही आणि थोडेफार मारले तरी काही बिघडत नाही
उत्तर द्याहटवा