कर्मवीर अण्णांच्या शाळा या गोरगरिबांच्या अस्मिता फुलविणारी तपोभूमी.”- प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
“बहुजन समाज शिक्षणापासून वंचित राहिला तर येणाऱ्या अनेक पिढ्या सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतील ही सामाजिक गरज ओळखून समाजाला वैचारिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली. त्यांच्या 'कमवा आणि शिका' या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनविले, गोरगरीब विद्यार्थ्यांची शिक्षणाप्रती अस्मिता जागृत केली. याचाच परिपाक म्हणून आज महाराष्ट्रभर व महाराष्ट्र बाहेरही रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शैक्षणिक संकुलांमधून लाखो विद्यार्थी आपले जीवन शिल्प घडवित आहेत.” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते व लेखक डॉ. यशवंत पाटणे यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री सदगुरु गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स अँण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय, पद्मा मेहता प्राथ. कन्या विद्यामंदिर डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव,या पाच शाखांच्या वतीने नुकताच १३८वा कर्मवीर जयंती सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मा. प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे बोलत होते.
पुढे म्हणाले की, “कर्मवीरांचा लढा हा मानव प्रतिष्ठेसाठी होता, त्यांनी शिक्षण हे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीचे प्रवेशद्वार मानले होते, जीवन क्षमतांचा विकास आणि मूल्यसंवर्धन हे शिक्षणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर्मवीरांनी शिक्षण व्यवस्थेत ज्ञानाची आणि श्रमाची सांगड घातली, त्यांनी श्रमाधिष्ठित शिक्षणाचा पुरस्कार केला. रयतेची वसतीगृहे ही सामाजिक ऐक्याची तपोभूमी आहे, समाजाच्या विविध घटकांमध्ये विश्वासाहर्ता निर्माण करून समता या नैतिक मूल्याची जोपासना केली, त्यामुळे रयतेच्या शाळा महाविद्यालयातून गुणवंत ज्ञानरत्ने तयार झाली. गुणवत्ता म्हणजे परीक्षेतील गुणांची गोळा बेरीज नसते, गुणवत्तेचा कस जीवनातील आव्हाने पेलताना दिसून येतो, जीवनाची सार्थकता आणि गुणवत्ता शिक्षणातून सिद्ध झाली पाहिजे, आणि हे करण्याचे काम आज रयत शिक्षण संस्था करते आहे, असेही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.”
कर्मवीर प्रतिमा पूजन आणि त्या नंतर सी.एम.मेहता कन्या विद्यामंदिर मधील विद्यार्थिनींनी सादर केलेल्या रयतगीत व स्वागतगीताने आरंभ झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.अॅड.भगीरथ शिंदे हे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात, “अज्ञानात चाचपडत असलेल्या समाजाला दिशा देण्याचे कार्य कर्मवीरांनी केले. समाजातील साक्षरता वाढविण्याचे काम कर्मवीरामुळे शक्य झाले, आज बदलत्या काळानुसार शिक्षण संस्था बदलते आहे, याचाच परिपाक म्हणून मोठ्या प्रमाणात रयत शिक्षण संस्थेतून कृत्रिम बुद्धिमत्ता विषयाचे मोठ्या प्रमाणात शिक्षण दिले जात आहे.” असे अभिमानाने सांगितले.
या कार्यक्रमासाठी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष .राजेश परजणे यांनी प्रत्यक्ष येऊन शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमासाठी जनरल बॉडी सदस्य पद्माकांत कुदळे, . सुरेश बोळीज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमाला पाचही शाखांचे शाखाप्रमुख प्राचार्य डॉ. माधव सरोदे, सौ.म्हस्के , काशिनाथ लव्हाटे, . सुभाष दरेकर, शिवाजी लंके, उपप्राचार्य डॉ.अर्जुन भागवत, डॉ. घन:श्याम भगत, प्रा. संजय शिंदे, कार्यालय अधीक्षक सुनील गोसावी यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. संतोष पवार यांनी करून दिला. मान्यवरांचे आभार मुख्याध्यापक काशिनाथ लव्हाटे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सीमा दाभाडे व प्रा. रवींद्र हिंगे यांनी केले.
सदर कार्यक्रमप्रसंगी शैक्षणिक संकुलातील सर्व प्राध्यापक,सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व पाचही शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.






