रेवतीच्या कवितांमधून उगवतोय नव्या साहित्ययुगाचा किरण
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या आहारी तरुणाई मोठ्या प्रमाणावर अडकताना दिसत असली, तरी कोपरगावातील एका सातवीच्या विद्यार्थिनीने स्वतःसाठी एक वेगळा आणि सृजनशील मार्ग निवडला आहे. रेवती गौरी संदीप चव्हाण ही फक्त १३ वर्षांची असली तरी तिने लहान वयात तब्बल ७५ स्वरचित कविता रचून आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
रेवती ही रयत शिक्षण संस्थेतील उपशिक्षक संदीप चव्हाण (करंजी) यांची कन्या असून ती सोमय्या विद्या विहार चे श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव येथे इयत्ता सातवीत शिकते.
रेवतीच्या कवितांमध्ये तिच्या निरागस भावविश्वाचा सुंदर वेध घेतलेला आहे.त्यात निसर्गकविता – पाऊस, फुले, नदी, चांदणं, आकाश अशा निसर्गसृष्टीचे मनमोहक चित्रण.तसेच भावकविता मध्ये आई-वडिलांचे,आजी आजोबांचे,काका आतु, मावशी यांचे ममत्व, मित्रमैत्रिणींचे खेळ, शाळेच्या आठवणी यांचा हळवा ओलावा,देशभक्तिपर भारतमातेचे गौरवगान, स्वातंत्र्यवीरांचे पराक्रम आणि देशासाठी बलिदान यांचा गौरव.,प्रेरणादायी कविता सकारात्मक विचार, आत्मविश्वास आणि स्वप्नपूर्तीचा संदेश देणारे आशावादी शब्द. अशा विषयां वर रचना आहे.
तिच्या काही स्वरचित कविता पैकी एक
माझा शिवबा
महाप्रताप त्यांचा ऐकून, पार मुघलांच्या अंगावर येई शहरा......
असा लखलखता सूर्य होता, स्वभाव त्याचा करारा....
शिव शंभूचा वंश ,जगदंबे चा वरदान त्याला...
स्वराज्यावर आलेलं प्रत्येक संकट,छाताडावर झेलण्याचं कौशल्य होत ज्याला.....
अहो ,एकच होता आणि सदैव राहील ,असा माझा शिवछत्रपती राजा....
नित्य त्याच्या चरणी, असावा मुजरा माझा....
प्रतापगडाच्या पायथ्याशी, अफजल्याचे पोट फाडिले....
स्वराज्यावर हात टाकणाऱ्याची ,लचके त्याने तोडिले.....
तानाजी मालुसरे ,बाजीप्रभू देशपांडे सारखे मावळे ज्याने जोडीले....
काय असते एकता, काय असते खरी मैत्री फक्त त्यांनीच जाणिले....
यातना कितीही झाल्या,मात्र नेत्री फक्त स्वराज्याचे स्वप्न झळकावे....
वार कितीही झाले ,तरी मुखातून फक्त जगदंब निघावे ,असे धगधगते काळीज फक्त माझ्या शिवबाचे असावे......
रेवतीच्या कवितांचा संग्रह केवळ वहीत न राहता आता एका स्वतंत्र वेबसाईटच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचला आहे. डिजिटल माध्यमामुळे तिच्या रचना व्यापक वाचकवर्गात पोहोचून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
नुकतेच आकाशवाणी केंद्र, अहिल्यानगर आयोजित ‘बालमेळा’ या लोकप्रिय कार्यक्रमात रेवतीची मुलाखत आणि कवितासादरीकरण प्रसारित झाले. रेडिओवरून झालेल्या या पहिल्या कविता सादरीकरणाला श्रोत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.
मागील काही महिन्यापूर्वी नाशिक येथे ज्ञानवर्धिनी संस्था आयोजित काव्यहोत्र या कार्यक्रमात रेवतीने उत्साहाने सहभाग घेतला. सलग २९ तास चाललेल्या या भव्य कविसंमेलनात तिने आपली रचना सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तिच्या या धाडसी व उल्लेखनीय सहभागाची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये झाली असून, हे कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यासाठी अभिमानाचे कारण ठरले हे.
रेवतीच्या या यशामागे तिच्या कुटुंबाचा, विशेषतः पालकांचा प्रोत्साहनपर हात आहे. शाळेचे मुख्याध्यापक वाकचौरे , उपमुख्याध्यापिका अमृतकर , पर्यवेक्षिका पहाडे , ससाने , वर्गशिक्षिका जोरी ,मराठी विषय शिक्षिका होन व शिंदे सर्व शिक्षक वृंद तिच्या साहित्यवृत्तीचे कौतुक करतात.एवढ्या कोवळ्या वयात एवढे विपुल लेखन करणारी रेवती भविष्यात मराठी साहित्यक्षेत्रात एक नवे आणि उज्ज्वल पर्व लिहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.






