नाशिक येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या "शेतकरी आक्रोश मोर्चात" सहभागी व्हा..अॅड. संदीप वर्पे
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शेतकरी कर्ज माफी, दुधाला, कांदाला भाव नाही, अतिवृष्टी यासह अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथून १५ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न व मागण्यांसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा चे आयोजन केलेले असुन नाशिक जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहभागी होवून पाठींबा द्यावे असे आवाहन अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष अॅड.संदीप वर्पे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
सदर शेतकरी आक्रोश मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, हे करणार असून
प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे,खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री जयंत पाटील, खा. अमोल कोल्हे, आ. जितेंद्र आव्हाड, राज्य प्रभारी आ. रोहित पवार यांच्यासह खासदार, आमदार, माजी खासदार, माजी आमदार यांच्यासह अनेक मान्यवर शेतकऱ्यांशी संवाद साधुन विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा झालाच पाहिजे व नवीन कर्ज वाटपात सीबीईएल ची अट्ट रद्द करा, कांद्याची मुक्त निर्यात सुरु करावी तसेच कांद्याला प्रतिकिलो १० रु अनुदान मिळावे,
कापसावरील आयात शुल्क हटवण्याचा निर्णय तात्काळ रद्द करून कापसाची आयात तात्काळ थांबवावी, तसेच कापसाला प्रति क्विंटल ३००० रु अनुदान,
अडचणीत आलेल्या द्राक्षे उत्पादक शेतकऱ्यांसाठी विशेष पैकेज जाहीर करुन द्राक्ष उत्पादकांची परराज्यातील व्यापा-यांकडून होणारी लुट व फसवणूक रोखण्यासाठी कायदा करा, भावांतर योजना तत्काळ लागू करा,
कृषी निविष्ठा, कृषी यंत्रसामग्रीवरील जी.एस.टी. तत्काळ रद्द करून जी.एस.टी मुक्त शेती झालीच पाहिजे, नैसर्गिक आपत्तीत झालेल्या नुकसानीची तात्काळ पंचनामे करून वाढीव दराने मदत मिळावी,
उत्पन्न खर्चाच्या दीडपट हमीभाव देऊन हमीभावाने १००% खरेदी करा,
दुधाला प्रतिलिटर मागे 10 रु. अनुदान द्या ,
कृषी सन्मान निधीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे तीन हजार रुपयांची वाढ करा ,
नव्या पीक विमा योजनेचे शेतकरी विरोधी निकष बदलून रुपयात पीकविमा योजना पूर्ववत करा ,
भाजीपाला पिकांसाठी विशेष मदत,
बोगस खते बियाणे विकणाऱ्यावर कठोर कारवाई,
खतांची लिंकींग थांबवावी ,
यासह अनेक शेतकऱ्यांचे विषय सरकारच्या निदर्शनास आणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून त्यात कोपरगाव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कोपरगाव तालुकाध्यक्ष बापू रांधवणे, कार्याध्यक्ष तानाजी जाधव,अॅड.दिलीप लासुरे, अॅड.रमेश गव्हाणे, सुरेश आसने, सुनिल वर्पे, निखिल थोरात आदींनी केले आहे.







