कोपरगावच्या प्रतिक सानपची राष्ट्रीय स्तरावरील थल सेना कॅम्प साठी निवड
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) युनिटमधील कॅडेट सानप प्रतीक दिनकर (SYBA) याची थल सैनिक शिबिर (Thal Sainik Camp - TSC), नवी दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे. ही निवड NCC च्या महाराष्ट्र निदेशालयातून फक्त निवडक कॅडेट्सना मिळणारा सन्मान आहे.
थल सैनिक शिबिर हे NCC च्या आर्मी विंगच्या अंतर्गत भारतभरातील सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठेचे शिबिर मानले जाते. या शिबिरात नकाशा वाचन, रायफल शूटिंग, अडथळा मार्ग, फील्ड क्राफ्ट, तंबू उभारणी, आणि शिस्तबद्ध प्रशिक्षण अशा विविध कौशल्यांवर आधारित स्पर्धा घेतल्या जातात. या शिबिरात सहभागी होण्यासाठी कॅडेटने तीन टप्प्यातील कठोर पूर्व-शिबिरे (Pre-TSC Camps) यशस्वीरीत्या पूर्ण करावी लागतात.
सानप प्रतीक याने उत्कृष्ट शारीरिक क्षमता, नेत्रदीपक नेतृत्वगुण व शिस्तबद्ध कामगिरीद्वारे आपले स्थान निश्चित केले. या उल्लेखनीय यशाबद्दल मा. अॅड. भगीरथ काका शिंदे, व्हाईस चेअरमन, रयत शिक्षण संस्था, चेअरमन, महाविद्यालय विकास समिती, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, NCC अधिकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर सेवक, महाविद्यालय विकास समिती यांच्यासह मित्र परिवाराने अभिनंदन केले आहे. तसेच 57 महाराष्ट्र बटालियन NCC अहमदनगर चे CO कर्नल राजेश आर. यांनी विशेष अभिनंदन केले आहे.
सानप प्रतीक याच्या या यशामुळे कोपरगाव शहर आणि एस.एस.जी.एम. महाविद्यालयाचे नाव उज्वल झाले असून, भविष्यात भारतीय सैन्यात भरती होण्याच्या दृष्टीने त्याने एक मजबूत पाऊल उचलले आहे.





