स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतात. -- विष्णू वाघ
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा आवश्यक असतात. चित्रकला स्पर्धा या मनुष्याला स्वतःचे विचार प्रत्यक्ष चित्रांद्वारे उतरवण्यासाठी मदत करत असतात असे प्रतिपादन तीळवणी येथील राष्ट्रसंत सद्गुरु गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष विष्णुपंत वाघ यांनी केले.
तालुक्यातील तिळवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेतील यशाबद्दल प्रत्येक वर्गातील तीन गुणवंत विद्यार्थ्यांना वही ,पेन ,कंपास पेटी, पेन्सिल ,खोडरबर ,चित्रकला वही यासारखे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अनिल शेळके, संपतराव शिंदे, शेलार, अमोल शिंदे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच गोविंद बाबा पगारे होते.
मुख्याध्यापक लक्ष्मण पंडोरे प्रास्ताविक करताना म्हणाले की, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी वाढविण्यासाठी महत्त्वाचा उपक्रम आहे.
पहिली ते सातवीच्या वर्गातील गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व विष्णू वाघ यांनी स्वीकारले. याप्रसंगी गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालय यांच्यावतीने दिला जाणारा २०२५.२६ चा गुणवंत शिक्षक पुरस्कार बंडू राठोड सर यांना देण्यात आला.
विष्णुपंत वाघ पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुला मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्पर्धा महत्त्वाच्या असतात. वाचनालये ही आताच्या युगातील ज्ञानाची मंदिरे आहेत. वाचन मनुष्याला संस्काराची आठवण करून देत असते. त्यातून आयुष्य घडते. शिक्षकांचा खरा दागिना वाचन आहे. तेव्हा तरुण पिढीने भ्रमणध्वनीच्या आहारी जाण्यापेक्षा सतत वाचन करावे त्यातून स्पर्धात्मक परीक्षा यशाचा मार्ग सापडत असतो. अध्यक्ष सरपंच गोविंद बाबा पगारे म्हणाले की, हर घर तिरंगा अभियानातून स्वातंत्र्यप्राप्तीसाठी योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकाची आठवण होत असते. लहान मुला मुलींमध्ये देशभक्ती यातून उत्पन्न होते.
सूत्रसंचालन विवेक तळपे तर आभार अशोक राहाणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब लहरे, श्रेया अनिल शेळके यांनी परिश्रम घेतले.





