संवत्सर येथे ओम साई मित्र मंडळाकडुन गणेशाची स्थापना
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर येथील ओम साई मित्र मंडळाच्या युवा कार्यकर्त्यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी अंगणवाडी परिसरात श्रीगणेशाची स्थापना करून पर्यावरण संतुलन राखण्याबाबतच्या उपक्रमावर भर दिला आहे.
श्रीक्षेत्र संवत्सर गावास पौराणिक ऐतिहासिक पार्श्वभुमी असुन रामायण काळापासुन अध्यात्मीक धार्मीक क्षेत्रात सदैव अग्रेसर आहे. ओम साई मित्र मंडळाच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी गणेशाची स्थापना करत दहा दिवस विविध स्पर्धा आयोजित करून त्यातुन मनोरंजनाबरोबरच युवा पिढीच्या बौध्दीक क्षमतेला वाव देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सामुहिक संघटनात्मकतेच्या माध्यमांतुन सामाजिक शैक्षणिक व पर्यावरणीय पातळीवर जनजागृती करण्याबरोबरच ताण तणावाच्या शैलीतुन युवकांनी स्वतःला कसे सांभाळावे व स्वतःबरोबरच परिसराचा कसा विकास साधायचा याचे धडे देण्यांत ओम साई मित्र मंडळाच्या सदस्यांचा प्रमुख उददेश आहे. गणपती उत्सव काळात शिस्तीला विशेष महत्व दिले जाते. सामाजिक सांस्कृतिक एकोपा सलोखा जोपासून कलात्मक देखावे सादर करून त्यातुन अंधश्रध्दा निर्मुलनाबरोबरच परिसर उत्कर्षासाठी प्रेरणा दिली जाते. व्यायामाबरोबरच बदलत्या संगणकीय परिस्थितीत युवकांनी कसे वागावे याचीही शिकवण दिली जाते त्यामुळे ओम साई मित्र मंडळाचे सर्वत्र कौतुक होते.





