एस. एस. जी. एम. कॉलेजच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना दक्षिण कोरिया येथे संशोधनासाठी संधी
संगक्युंनक्वान विद्यापीठाशी सामंजस्य करार
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव या महाविद्यालयाने दक्षिण कोरिया येथील संगक्युंनक्वान विद्यापीठाशी यशस्वीरित्या सामंजस्य करार केला. “या करारामुळे महाविद्यालयाच्या परिसरातील, ग्रामीण भागातील रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र हे अभ्यासविषय असलेल्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना दक्षिण कोरिया येथे संशोधनासाठी नवीनतम संधी उपलब्ध झाली आहे”.अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधव सरोदे यांनी दिली.
दि. २५ ते २७ जून यादरम्यान दक्षिण कोरिया येथील संगक्युंनक्वान विद्यापीठात झालेल्या पाचव्या AMSCA- 2025 या आंतरराष्ट्रीय परिषदेत महाविद्यालयाचे प्रा.डॉ. विलास गाडे यांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्यावेळी हा सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे महाविद्यालयातील विज्ञान शाखेचे प्राध्यापक व विद्यार्थी संगक्युंनक्वान विद्यापीठातील (Sunkyunkwan University, Suwon, South Korea) प्राध्यापकांसमवेत एकत्रितपणे उच्च दर्जाचे संशोधन करणार आहे.
या कराराच्या यशस्वितेबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड. भगीरथकाका शिंदे, महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. माधव सरोदे, IQAC समन्वयक डॉ. निलेश मालपुरे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. ए. के. देशमुख, कार्यालयीन अधीक्षक सुनील गोसावी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.





